पोस्टल ग्राऊंडवर केवळ ‘फूड पार्क’
By Admin | Updated: September 6, 2015 02:24 IST2015-09-06T02:24:28+5:302015-09-06T02:24:28+5:30
पोस्टल ग्राऊंडवर बांधण्यात आलेल्या २६ दुकानांमध्ये केवळ ‘फूड पार्क’ राहणार आहे. त्यामुळे कार्यालये थाटू इच्छिणाऱ्यांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.

पोस्टल ग्राऊंडवर केवळ ‘फूड पार्क’
जागेचाही लावला भाव : बाजारापेक्षा १० टक्के जादा दर
यवतमाळ : पोस्टल ग्राऊंडवर बांधण्यात आलेल्या २६ दुकानांमध्ये केवळ ‘फूड पार्क’ राहणार आहे. त्यामुळे कार्यालये थाटू इच्छिणाऱ्यांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.
पोस्टल ग्राऊंडवर बांधण्यात आलेल्या दुकानांचे भाडे व डिपॉझिटची रक्कम बरीच मोठी असली तरी ही दुकाने नेमकी कुणाला देणार याची चर्चा गेली दोन दिवस सुरू होती. अखेर तेथे केवळ ‘फूड पार्क’ राहणार असल्याचे सांगण्यात आले. लीजवर दिल्या जाणाऱ्या या दुकानांना बाजार भावानुसार डिपॉझिटची रक्कम आकारण्यात आली आहे. शिवाय बाजारभावापेक्षा दहा टक्के जादा भाडे आकारले गेले आहे. दुकानाचा आकार व त्या तुलनेत डिपॉझिट व भाड्याची वाढलेली रक्कम पाहूनच नगररचना विभागाने अप्रत्यक्ष विरोध दर्शवित या दुकानांची फाईल थंड बस्त्यात ठेवली होती.
मात्र प्रशासनाकडून दणका आल्यानंतर ही फाईल मुंबईला पाठविण्यात आली. त्यानंतर त्याला मंजूरी मिळाल्याचे सांगितले जाते. तत्कालीन जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांच्या कार्यकाळात या दुकानांचा आराखडा तयार झाला. पोलीस अधीक्षक कार्यालयाला लागून असलेली दुकाने कार्यालयीन कामासाठी, तर त्याच्या बाजूची दुकाने महिला बचत गटांना, शेतकरी बचत गटांना वाजवी किमतीत देण्याचे तत्वत: ठरविण्यात आले होते. परंतु त्यांची बदली झाली आणि हे उद्दिष्ट मागे पडले. आता तेथे ‘फूड पार्क’ आणि तेही बाजार भावाने थाटले जाणार आहे. (प्रतिनिधी)