वणीत प्रवासी तपासण्याचा केवळ फार्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 05:00 IST2020-05-16T05:00:00+5:302020-05-16T05:00:41+5:30

परसोडा येथे आरोग्य केंद्रावर तिने स्वत: जाऊन तपासणीसाठी आग्रह केला. परंतु तेथे उपस्थित आरोग्य कर्मचाऱ्यांनी तिला केवळ ताप आहे का? एवढी विचारणा करून तिच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारला. हा प्रकार पाहून तेजलने माझी व्यवस्थित तपासणी करा, असा आग्रह धरला. परंतु तेथे उपस्थित कर्मचाऱ्यांनी तुम्हाला तपासण्याची गरज नाही, ताप, सर्दी, खोकला असल्यास तुम्ही सरकारी दवाखान्यात जा, असा सल्ला तिला दिला.

The only farce of checking travelers in Wani | वणीत प्रवासी तपासण्याचा केवळ फार्स

वणीत प्रवासी तपासण्याचा केवळ फार्स

ठळक मुद्देजुजबी विचारपूस : हातावर शिक्का मारून केले जात आहे घराकडे रवाना

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : लॉकडाऊननंतर परराज्य व परजिल्ह्यात अडकून पडलेल्यांचे लोंढे आता वणीत पोहोचू लागले असून गुरूवारी रात्रीपर्यंत हा आकडा ४०१ वर गेला. यात आंध्रप्रदेश, पुणे, नागपूर येथून येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. असे असताना बाहेरून येणाऱ्या या नागरिकांची गंभीरतेने तपासणीच केली जात नसल्याच्या तक्रारी आहे. विशिष्ट अंतरावर उभे करून ‘तुम्हाला ताप आहे का?’ एवढीच जुजबी विचारणा केल्यानंतर हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारून त्यांना घराकडे पाठविले जात आहे.
आरोग्य विभागाच्या या बेगडी तपासणीमुळे वणी शहराला धोका निर्माण झाला आहे. मूळ वणी येथील रहिवासी असलेली तेजल शेंडे ही पुण्यात शिक्षण घेत आहे. तसेच ती नोकरीही करते. मात्र लॉकडाऊनमुळे ती पुण्यात अडकून पडली होती. दरम्यान, आपापल्या गावी जाण्यासाठी शासनाने परवानगी दिल्यानंतर वणीतून पाठविलेल्या एका खासगी वाहनातून ती गुरूवारी रात्री १० वाजताच्या सुमारास वणीच्या सिमेवर पोहोचली. त्यानंतर परसोडा येथे आरोग्य केंद्रावर तिने स्वत: जाऊन तपासणीसाठी आग्रह केला. परंतु तेथे उपस्थित आरोग्य कर्मचाऱ्यांनी तिला केवळ ताप आहे का? एवढी विचारणा करून तिच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारला. हा प्रकार पाहून तेजलने माझी व्यवस्थित तपासणी करा, असा आग्रह धरला. परंतु तेथे उपस्थित कर्मचाऱ्यांनी तुम्हाला तपासण्याची गरज नाही, ताप, सर्दी, खोकला असल्यास तुम्ही सरकारी दवाखान्यात जा, असा सल्ला तिला दिला. त्यानंतर ती वणीतील स्वत:च्या घरी पोहोचली. राज्यात मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या महानगरांमध्ये कोरोनाचा वेगाने फैलाव होत आहे. या पार्श्वभूमीवर या शहरांमधून येणाऱ्या नागरिकांची तरी गंभीरतेने तपासणी करणे गरजेचे आहे. मात्र तशी तपासणीच केली जात नसल्याने वणी शहराला धोका वाढला आहे. आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन जुजबी तपासणीचा फार्स बंद करावा व कोरोनाबाधित क्षेत्रातून येणाऱ्या नागरिकांची प्रामाणिक तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.

हात धुतल्यानंतर शिक्का होतो गायब
ज्या व्यक्तीला होम क्वारंटाईन करण्यात आले, त्याच्या हातावर शिक्का मारण्यात येतो. वणीतही तसा शिक्का मारल्या जात आहे. परंतु हात धुतल्यानंतर तो शिक्काही गायब होत असल्याने शिक्का मारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शाईचा दर्जा निकृष्ट असल्याचे दिसून येत आहे. या प्रकारामुळे होम क्वारंटाईन व्यक्तीची ओळख पुसली जात आहे.

Web Title: The only farce of checking travelers in Wani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.