आठ तास विजेचा केवळ गवगवा

By Admin | Updated: August 31, 2015 02:22 IST2015-08-31T02:22:43+5:302015-08-31T02:22:43+5:30

उदापूर येथे शनिवारी सायंकाळी वीज अभियंत्याला शेतकऱ्यांनी मारहाण केली. मात्र शेतकऱ्यांना आठ तास वीजपुरवठा करण्याचा वीज कंपनीकडून केवळ गवगवाच केला जात आहे.

Only eight hours of electricity will be produced | आठ तास विजेचा केवळ गवगवा

आठ तास विजेचा केवळ गवगवा

नेर : उदापूर येथे शनिवारी सायंकाळी वीज अभियंत्याला शेतकऱ्यांनी मारहाण केली. मात्र शेतकऱ्यांना आठ तास वीजपुरवठा करण्याचा वीज कंपनीकडून केवळ गवगवाच केला जात आहे. प्रत्यक्षात मात्र पाच-पाच मिनिटांनी वीजपुरवठा खंडित होतो. एकंदर तीन तासांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना वीज पुरवठा केला जात नाही. अशा गंभीर अवस्थेत रात्री जागरण करून ओलित करणाऱ्या शेतकऱ्यांच्या वेदना वीज कंपनीला दिसत नाही का, असा संतप्त सवाल उदापूरवासीयांनी पत्रकार परिषदेत केला.
नेर तालुक्यातील उदापूर क्षेत्रात १५ गावांचा समावेश होतो. उदापूर येथे गेल्या दहा दिवसांपासून पाच-पाच मिनिटांनी विद्युत पुरवठा खंडित होत आहे. विद्युत कंपनीने शेतकऱ्यांच्या तीन फेजसाठी आठ तास पुरवठा करण्याचे धोरण अवलंबले आहे. यात एकाच आठवड्यात १५ ते १६ तास वीज पुरवठा वीज कंपनीने दिला. येथील नागरिकांनी या बाबत वीज कंपनीकडे तक्रारीही केल्या. मात्र शेतकऱ्यांच्या परिस्थितीची कुणीही दखल घेतली नाही. रात्रीच्या अंधारात शेतकऱ्यांना ओलित करावे लागत आहे. त्यातही सुरळीत नसलेला वीज पुरवठा शेतकऱ्यांना मानसिक त्रास देत आहे. शेतकऱ्याला वारंवार विद्युत पंप चालू आणि बंद करावा लागत आहे.
अव्वाच्या सव्वा बिले देणाऱ्या वीज कंपनीला शेतकऱ्यांच्या यातना कधीच दिसत नाही. शेतकऱ्यांचे रोहित्र जरी जळाले तरी त्याचे पैसे शेतकऱ्यांकडूनच उकळले जात आहे. कोणताही वायरमन मुख्यालयी हजर राहात नाही. शेतकऱ्यांच्या शेतात जाणाऱ्या केबलला झाडाच्या फांद्या जरी लागल्या तरी त्याचे पैसे शेतकऱ्यांकडूनच वसूल केले जातात. खासगी वायरमनकडून कामे करून घेतल्या जात आहे. एवढे सगळे असतानाही तकलादू वीज पुरवठा करून शेतकऱ्यांवर बिले लादली जात आहे. संपूर्ण नेर तालुक्यात शेतकऱ्यांची हीच व्यथा आहे. सध्या पावसाने दडी मारलेली आहे. या अवस्थेत बळीराजा शेतात रात्री-बेरात्री ओलित करण्यासाठी जात आहे. मात्र अकार्यक्षम वीज कंपनी आठ तास वीज पुरवठा देण्यासाठीही तयार नाहीत. या बाबत सुरळीत पुरवठा द्या, तसेच उच्च दाबाचा पुरवठा द्यावा या संदर्भात शनिवारी रात्री ७ वाजता उदापूर येथील नागरिक गेले होते. मात्र वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता संजय पाटणे यांनी शेतकऱ्यांना वाईट शब्दात उत्तर दिले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक होवून मारहाण झाली. वीज पुरवठ्यातील अनियमितपणामुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रास टाळण्यासाठी वरिष्ठांनी या बाबीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांच्यावतीने अजय भोयर यांनी दिला. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Only eight hours of electricity will be produced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.