विदर्भातील एकमेव सहकारी साखर कारखाना अवसायनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:47 IST2021-08-14T04:47:34+5:302021-08-14T04:47:34+5:30

फोटो अविनाश खंदारे उमरखेड : विदर्भातील एकमेव सहकारी साखर कारखाना असलेला तालुक्यातील पोफाळी येथील ‘वसंत’ सहकारी साखर कारखाना अखेर ...

The only co-operative sugar factory in Vidarbha in liquidation | विदर्भातील एकमेव सहकारी साखर कारखाना अवसायनात

विदर्भातील एकमेव सहकारी साखर कारखाना अवसायनात

फोटो

अविनाश खंदारे

उमरखेड : विदर्भातील एकमेव सहकारी साखर कारखाना असलेला तालुक्यातील पोफाळी येथील ‘वसंत’ सहकारी साखर कारखाना अखेर अवसायनात निघाला. त्यामुळे शेकडो ऊस उत्पादक, कामगार, लघू व्यावसायिकांवर संकट ओढवले आहे.

पुसद, उमरखेड, महागाव, हदगाव आणि हिमायतनगर या पाच तालुक्यांतील ऊस उत्पादक शेतकऱ्याची कामधेनू म्हणून वसंतची ओळख आहे. २०१५-१६ मध्ये कारखान्याची आर्थिक परिस्थिती डबघाईस येऊन कारखाना ठप्प झाला. हंगाम २०१८-१९ मध्ये कारखाना पूर्णतः बंद पडला. संचित तोटा वाढल्याचे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी अहवालात नमूद केले. प्रादेशिक सहसंचालक, अमरावती (साखर) यांनी अखेर कारखाना अवसायनात काढला. वाय.पी. गोतरकर यांची अवसायक म्हणून नियुक्ती केली.

‘वसंत’ सुरू करण्यासाठी खासदार हेमंत पाटील, आमदार ॲड. नीलय नाईक, आमदार डॉ. वजाहत मिर्झा, आमदार इंद्रनील नाईक, आमदार माधवराव पाटील, आमदार नामदेव ससाने, माजी आमदार विजयराव खडसे व राजेंद्र नजरधने यांच्यासह ऊस उत्पादक सभासद संघ व कामगार संघटनांनी पाठपुरावा केला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा पाठपुरावा केला. परंतु, कारखान्यावरील आर्थिक बोजा वाढल्यामुळे कारखाना सुरू झाला नाही.

दरम्यान, प्रशासक सुरेश महंत यानी वेळोवेळी कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा प्रयत्न केला. दोनदा निविदाही काढल्या. मात्र, उपयोग झाला नाही. अखेरीस कारखाना अवसायनात निघाला. यामुळे कारखान्यावरील व्याज व्याज कमी होणार असल्याचे सांगितले जाते. तथापि, शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. कर्मचारी, कामगार, शेतकऱ्यांची कोट्यवधींची देणी कारखान्याकडे बाकी आहेत. या विभागातील लोकप्रतिनिधी आपली भूमिका योग्य बजावू शकले नाहीत, अशी खंत शेतकरी व्यक्त करीत आहेत.

बॉक्स

‘वसंत’चे वसंत बंद झाल्याने स्वप्न भंगले

१९६७ मध्ये माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे प्रणेते दिवंगत वसंतराव नाईक यांनी शेतकऱ्यांना सुजलाम्, सुफलाम् करण्यासाठी कारखाना स्थापन केला होता. त्यांनी शेतकऱ्यांना सुखी करण्याचे स्वप्न बघितले होते. मात्र, वसंत अवसायनात निघाल्याने आता दिवंगत वसंतराव नाईक यांच्या अथक प्रयत्नातून निर्माण झालेला व त्यांच्याच नावाने असलेला कारखाना बंद पडला आहे. यापूर्वी दिवंगत सुधाकरराव नाईक सहकारी साखर कारखानासुद्धा अवसायनात निघाला. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी आत्मचिंतन करण्याची गरज शेतकरी व्यक्त करीत आहेत.

कोट

वसंत साखर कारखान्यावर जिल्हा बँकेचे कर्ज आहे. पुसद, उमरखेड, हदगाव, हिमायतनगर, महागाव या पाच तालुक्यांतील ऊस उत्पादक व कामगार यांचे हित लक्षात घेऊन कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी प्रयत्न करू.

वाय.पी. गोतरकर, अवसायक

कोट

वसंत कारखाना सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधी कमी पडले. कारखाना अवसायनात काढताना ऊस उत्पादक व कामगारांना विश्वासात घेतले नाही. अवसायनाची माहिती देण्यासाठी कारखाना साइटवरील नोटीस बोर्डावर प्रशासकांनी नोटीस लावली नाही. त्यामुळे ऊस उत्पादक व कामगार यांच्या हिताचा निर्णय झाला नाही. आम्ही आमची लढाई सुरू ठेवणार आहोत.

- व्ही.एम. पंतगराव, अध्यक्ष, कामगार संघटना

Web Title: The only co-operative sugar factory in Vidarbha in liquidation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.