विद्यार्थ्यांसाठी आॅनलाईन शिष्यवृत्ती डोकेदुखी
By Admin | Updated: October 11, 2014 02:18 IST2014-10-11T02:18:28+5:302014-10-11T02:18:28+5:30
शासनाने शिष्यवृत्ती आॅनलाईन करून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज भरणे सोयीचे होईल, या हेतूने गेल्या तीन वर्षांपासून आॅनलाईन प्रक्रिया सुरू केली.

विद्यार्थ्यांसाठी आॅनलाईन शिष्यवृत्ती डोकेदुखी
नांदेपेरा : शासनाने शिष्यवृत्ती आॅनलाईन करून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज भरणे सोयीचे होईल, या हेतूने गेल्या तीन वर्षांपासून आॅनलाईन प्रक्रिया सुरू केली. मात्र शिष्यवृत्ती अर्ज वेळेत अपलोड होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे़
शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचा आर्थिक स्तर उंचावा म्हणून शासनाच्या समाज कल्याण विभाग व आदिवासी विभागाने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर केली़ उत्पन्नाची मर्यादा निर्धारित करून विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते़ यापूर्वी शाळा, महाविद्यालयांमध्ये अर्ज भरून कागदपत्रे दिली जात होती़ नंतर कार्यालयामार्फत समाज कल्याणकडे मंजुरीकरिता प्रस्ताव पाठविले जात होते. त्यामुळे ठरलेल्या वेळेत कागदपत्रे पूर्ण करून शाळा, महाविद्यालयांमध्ये ते देऊन विद्यार्थी सुटकेचा श्वास घ्यायचे़
आता गेल्या तीन वर्षांपासून आॅनलाईन शिष्यवृत्ती अर्ज विद्यार्थ्यांना भरावे लागत आहे़ त्यामुळे विद्यार्थी इंटरनेट कॅफेवर शिष्यवृत्ती अर्ज भरण्याकरिता गर्दी करीत असल्याचे दिसून येत आहे़ नोकरी संदर्भात आॅनलाईन अर्ज भरावा लागत असल्याने सुशिक्षीत बेरोजगारही इंटरनेट कॅफेवर अर्ज भरण्याकरिता गर्दी करीत आहे़ त्यामुळे कधी लिंक फेल, कधी साईट डाऊन, तर कधी नेटवर्क जाम, या सगळ्या समस्यांना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत आहे़
या सर्व बाबींमुळे विद्यार्थ्यांना निर्धारित तारीख व वेळेत शिष्यवृत्ती अर्ज भरणे कठीण झाले आहे. आपला अर्ज निर्धारित वेळेत पोहोचेल की नाही, अशी शंका त्यांना सतावत आहे. या आॅनलाईन प्रक्रियेत अडकून आपण शिष्यवृत्तीपासून वंचित तर राहणार नाही ना, अशी धास्ती त्यांना सतावत आहे. शिष्यवृत्ती न निळाल्यास शाळा, महाविद्यालय आपल्याकडून पूर्ण शैक्षणिक शुल्क वसूल करेल, अशी भिती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे चांगल्या हेतूने सुरू केलेली आॅनलाईन प्रक्रियाच आता डोकेदुखी ठरली आहे. (वार्ताहर)