आॅनलाईन उमेदवारीचा खोळंबा
By Admin | Updated: July 9, 2015 02:39 IST2015-07-09T02:39:30+5:302015-07-09T02:39:30+5:30
राज्यात सध्या दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे. उमरखेड तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतींसाठी आता निवडणूक होणार आहे.

आॅनलाईन उमेदवारीचा खोळंबा
ग्रामपंचायत निवडणूक : दिवसभर लिंक बंद, अनेक ठिकाणी अप्रशिक्षित आॅपरेटर
उमरखेड : राज्यात सध्या दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे. उमरखेड तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतींसाठी आता निवडणूक होणार आहे. त्या अनुषंगाने यावेळी प्रथमच आॅनलाईन अर्जप्रणाली सुरू करण्यात आली आहे. परंतु उमरखेड येथे दिवसभर लिंक बंद असल्याने उमेदवारी अर्जच भरता आले नाही. त्यामुळे शेकडो उमेदवारांची उमेदवारीच धोक्यात आली असून, एकच तारांबळ उडाली.
४ ते १० जुलैपर्यंत आॅनलाईन प्रणालीव्दारा इच्छुकांनी अर्ज सादर करावयाचे आहेत. सध्या केवळ ३५ अर्ज दाखल झालेले आहेत. उमरखेड तालुक्यात ५४ ग्रामपंचायतींच्या ४८२ पदांसाठी व १० ग्रामपंचायतमध्ये होत असलेल्या पोटनिवडणुकीच्या १० जागांसाठी अशा ४९२ सदस्यांसाठी ही निवडणूक होत आहे. बुधवारी दिवसभर आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी उमरखेड शहरातील सर्वच संगणक केंद्रांवर उमेदवारांची गर्दी होती. मात्र सकाळी ११ पासूनच लिंक बंद असल्यामुळे दिवसभरात एकही अर्ज दाखल होऊ शकला नाही. आता अर्ज दाखल करण्यासाठी केवळ दोन दिवस उरल्याने सर्व इच्छुकांची उमेदवारी दाखल होणार की नाही अशी शंका व्यक्त होत आहे. आॅनलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत तालुक्यात प्रचंड गोंधळाची स्थिती दिसून येत आहे. ग्रामीण भागातील उमेदवारांची याव्दारे चांगलीच दमछाक होताना दिसून येत आहे. त्यातच नियमित येणाऱ्या तांत्रिक अडचणी आणि अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव यातून उमेदवारांना मात्र विनाकारण त्रास होत आहे. त्यातच तालुक्यातील बंदी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ९० किलोमीटर अंतरावरून पुरूषांसह इच्छुक महिलाही उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमरखेडला येत आहे. आॅनलाईन लिंक बंद असल्यामुळे शेकडो उमेदवारांनी तहसील कार्यालयासमोर गर्दी केली होती. निवडणूक आयोगाने या गंभीर बाबीची दखल घेऊन त्वरित पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी संबंधित उमेदवारांमधून होत आहे.
याबाबत विडूळ परिसराचे जिल्हा परिषद सदस्य संदीप हिंगमिरे यांच्याशी संपर्क साधला असता ग्रामपंचायत निवडणुकीत आॅनलाईन अर्ज प्रणालीचा पहिल्यांदाच आवलंब केला जात आहे. त्यातच तांत्रिक अडचणी येत असल्याने ठराविक वेळेत अर्ज भरणे शक्य होणार नसल्याने अनेक उमेदवार वंचित राहण्याचा धोका त्यांनी व्यक्त केला आहे. निवडणूक आयोगाने यासंदर्भात त्वरित मार्ग काढून दिलासा न दिल्यास जनआंदोलन उभारण्याचा इशाराही हिंगमिरे यांनी दिला आहे. उल्लेखनीय म्हणजे तालुक्यात प्रथमच राबविल्या जाणाऱ्या या आॅनलाईन उमेदवारीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी संगणक केंद्रांवरील आॅपरेटर्सना यासंदर्भातील कोणतेही तांत्रिक प्रशिक्षण नाही. अप्रशिक्षित आॅपरेटर्समुळे ही प्रक्रिया अधिकच किचकट बनली आहे. त्यामुळे इच्छुक उमदेवारांमध्ये रोष व्यक्त होत आहे. (शहर प्रतिनिधी)