आॅनलाईन सेवेचा शेतकऱ्यांना फटका
By Admin | Updated: July 31, 2014 00:16 IST2014-07-31T00:16:37+5:302014-07-31T00:16:37+5:30
येथील तहसील कार्यालयातील आॅनलाईन सेवेचा फटका शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिकांना बसत असून सर्व्हरची गती मंदावल्याने शेकडो शेतकऱ्यांचे फेरफार अडकले आहेत.

आॅनलाईन सेवेचा शेतकऱ्यांना फटका
फेरफार अडकले : सर्व्हरची गती मंदावली, मंडळ अधिकारी, तलाठ्यांकडून पिळवणूक
महागाव : येथील तहसील कार्यालयातील आॅनलाईन सेवेचा फटका शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिकांना बसत असून सर्व्हरची गती मंदावल्याने शेकडो शेतकऱ्यांचे फेरफार अडकले आहेत.
महागाव तहसीलमधील शेतकऱ्यांच्या फेरफार नोंदी अडकल्या आहेत. त्यामुळे पीक कर्ज, गृह कर्ज आदींसाठी फेरफारची नक्कल मिळत नाही. तलाठी किंवा तहसील कार्यालयात जाऊन फेरफार नक्कल मागितली असता सर्व्हर बंद असल्याचे कारण देऊन यंत्रणा हातवर करीत आहे. सर्व्हर का बंद आहे याची साधी चौकशी करायला कुणी तयार नाही. फेरफारसाठी तलाठ्यांकडून मोठ्या रकमेची मागणी होत असून त्यामुळेच सर्व्हर हे कारण पुढे केले जात असल्याचा आरोप शेतकरी करीत आहे.
फेरफारसाठी शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असून नियमबाह्य काही तरी कारणे देऊन शेतकऱ्यांची पायपीट केली जात आहे. फेरफारचे भाव तलाठी, नायब तहसीलदार आणि मंडळ अधिकाऱ्यांनी ठरविले असून ती रक्कम मिळेपर्यंत फेरफारच दिला जात नाही. तसेच तलाठी, मंडळ अधिकारी ठरल्यावेळेवर आणि ठरल्याठिकाणी सापडत नाही. या प्रकारामुळे शेतकऱ्यांचे पीक कर्ज, जातीचे दाखले आदी कारणांसाठी तहसील कार्यालयात गर्दी उसळत आहे. गावोगावी उभारलेल्या महा-ईसेवा केंद्राचे कामही चांगलेच ढेपाळले आहे. याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. सध्या शैक्षणिक कामासाठी विद्यार्थ्यांना विविध दाखल्याची गरज भासते. आपल्या गावच्या तलाठ्याला शोध घेत अनेक जण शहरात पायपीट करताना दिसत आहे. आधीच कर्मचारी मुख्यालयी राहत नाही, त्यात शहरातही भेटायला तयार नसतात. (शहर प्रतिनिधी)