पोलीस बंदोबस्तात शिष्यवृतीचे आॅनलाईन अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 22:05 IST2017-08-31T22:05:22+5:302017-08-31T22:05:34+5:30

राज्य शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेसाठी आधार क्रमांक सक्तीचा करण्यात आला आहे. या आधार क्रमांकाशी मोबाईल क्रमांक कनेक्ट करण्याचे आदेश आहेत.

Online application of scholarships in the police station | पोलीस बंदोबस्तात शिष्यवृतीचे आॅनलाईन अर्ज

पोलीस बंदोबस्तात शिष्यवृतीचे आॅनलाईन अर्ज

ठळक मुद्देप्रशासनाची स्पष्टोक्ती : ३१ आॅगस्टनंतरही अर्ज स्वीकारले जातील

यवतमाळ : राज्य शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेसाठी आधार क्रमांक सक्तीचा करण्यात आला आहे. या आधार क्रमांकाशी मोबाईल क्रमांक कनेक्ट करण्याचे आदेश आहेत. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील एकमेव केंद्रावर शेकडो विद्यार्थ्यांची झुंबड दिसून येत आहे. विद्यार्थ्यांच्या वाढत्या गोंधळामुळे पोलिसांनाही पाचारण करण्यात आले होते. ३१ आॅगस्ट ही शिष्यवृत्तीसाठी आधार अपडेशनची शेवटची तारीख नाही, असे जिल्हाधिकारी कार्यालय व समाजकल्याण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता आणि गर्दी न करता, नियमानुसार आपले आधार अपडेशन करावे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. शिष्यवृत्ती योजनेसाठी आधार क्रमांकाला मोबाईल क्रमांक जोडणे गरजेचे आहे. आणि यासाठी सध्या जिल्हाधिकारी कार्यालयातील एकमेव केंद्र सुरू आहे. या ठिकाणी सकाळी बारा वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना फॉर्म देण्यात येते आणि नंतर तेवढ्याच विद्यार्थ्यांचे फॉर्म स्वीकारल्या जाते. परंतु ३१ आॅगस्ट ही शेवटची तारीख असल्याची अफवा पसरल्याने विद्यार्थ्यांनी दोन-तीन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयात मोठी गर्दी केली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी लागत आहेत. विद्यार्थ्यांचा वाढता गोंधळ पाहता अखेरीस जिल्हा प्रशासनाने पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवला होता. काही महाविद्यालयांनीसुद्धा कोणतीही शहानिशा न करता महाविद्यालय बंद ठेवून विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी कार्यालया पाठविणे सुरू केले आहे. तर काही विद्यार्थी संघटनांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन विद्यार्थी संख्या पाहता, जिल्ह्यात त्वरित आधार केंद्र वाढविण्याची मागणी केली होती.
याबाबत वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ने जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा समाज कल्याण अधिकारी किशोर भोयर यांच्याशी संपर्क साधला असता. ३१ आॅगस्ट ही शेवटची तारीख नसल्याने स्पष्ट करण्यात आले असून वरिष्ठांकडून आम्हाला तशी तारीख कळविल्यानंतर ती सर्वांसाठी जाहीर करण्यात येईल, असे सांगितले.

तीनशे ते चारशे विद्यार्थी एकाचवेळी येत आहेत, त्यामुळे गोंधळ वाढला आहे. प्रत्येकाला आम्ही टोकण दिले आहे. एकच सेंटर सुरू आहे. जास्तचे सेंटर आत्ताच सुरू करणे शक्य नाही. तीनशेपेक्षा अधिक विद्यार्थी असेल तर प्राचार्यांनी आमच्यासोबत संपर्क साधणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी घाबरून जायची गरज नाही, ३१ आॅगस्ट ही शेवटची तारीख असल्याचे शासनाने कुठेही म्हटलेले नाही.
- नरेंद्र फुलझेले
निवासी उपजिल्हाधिकारी, यवतमाळ

Web Title: Online application of scholarships in the police station