मदत निधी वाटपाचा आॅनलाईन प्रयोग
By Admin | Updated: February 22, 2015 02:04 IST2015-02-22T02:04:12+5:302015-02-22T02:04:12+5:30
दुष्काळीस्थितीमुळे बेजार झालेल्या शेतकऱ्यांना राज्यशासनाने हेक्टरी मदत जाहीर केली. या मदतीच्या वाटपाच्या प्रक्रियेत यवतमाळ तहसील कार्यालयाने आॅनलाईन प्रक्रियेचा

मदत निधी वाटपाचा आॅनलाईन प्रयोग
यवतमाळ : दुष्काळीस्थितीमुळे बेजार झालेल्या शेतकऱ्यांना राज्यशासनाने हेक्टरी मदत जाहीर केली. या मदतीच्या वाटपाच्या प्रक्रियेत यवतमाळ तहसील कार्यालयाने आॅनलाईन प्रक्रियेचा प्रयोग यशस्वीरित्या पूर्ण केला. थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही याची इतंभूत माहिती मोबाईल मॅसेजव्दारे मिळत होती. आॅनलाईन प्रक्रियेमुळे अतिशय नगण्य चुका या वाटपात झाल्याचे दिसून आले आहे.
शासनाकडून मिळालेला मदत निधी अथवा अनुदान, वाटपाची जबाबदारी महसूल यंत्रणेवरच सोपविली जाते. बरेचदा लाखोंच्या घरात असलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यात रकमा जमा करताना अनेक चुका होतात. या चुका टाळण्यासाठीच यवतमाळ तहसीलदार अनुप खांडे यांनी आॅनलाईन बँकींगचा आधार घेतला. तालुक्यातील २२ हजार शेतकऱ्यांची बँक खाती त्यांच्याच नावाने आहे की नाही याची पडताळणी केली. त्यानंतर शहरातील एका खासगी बँकेच्या सर्व्हरच्या माध्यमातून मदत निधी वितरणास सुरूवात केली. पहिल्या टप्प्यात आठ कोटी १७ हजाराचे वाटप करण्यात आले. १४ हजार ७०० शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा केली गेली.
या आॅनलाईन प्रक्रियेचे वैशिष्ट्य म्हणजे एखाद्या शेतकऱ्याचा खाते नंबर चुकलेला असला किंवा कुठल्याही कारणास्तव खात्यात रक्कम जमा झाली नाही तर त्याचा थेट मॅसेज शेतकऱ्यांच्या नावानिशी येत होता. शिवाय ज्या शेतकऱ्यांनी मोबाईल नंबर, बँक खाते जोडले आहेत त्यांनाही मदतनिधी जमा झाल्याचा मॅसेज येत होता.
या आॅनलाईन प्रक्रियेत केवळ २६ खातेदारांचेच पैसे जमा झाले नाहीत. २२ हजार शेतकऱ्यांपैकी केवळ २६ जणांना अडचणी येणे यावरून हा प्रयोग यशस्वी झाल्याचे दिसून येते.
आॅनलाईन प्रक्रियेमुळे महसूलातील मदतनिधी वाटपातही पारदर्शकता आली आहे. जिल्ह्यात पहिलाच प्रयोग यवतमाळ तहसील कार्यालयाने यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. याचा फायदाही यंत्रणेसोबतच लाभार्थी शेतकऱ्यांना मिळत आहे. यापद्धतीने निधी वाटप केल्यामुळे एकही तक्रार शेतकऱ्यांकडून आलेली नाही, हे या प्रयोगाचे
वैशिष्ट्य असल्याचे तहसीलदार अनुप खांडे यांनी सांगितले.
(कार्यालय प्रतिनिधी)