एक लाखांवर कृषिपंपांना मिळणार १२ तास वीज
By Admin | Updated: September 9, 2016 02:38 IST2016-09-09T02:38:05+5:302016-09-09T02:38:05+5:30
कृषिपंपांना दिवसा १२ तास वीज देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेची जिल्ह्यात वीज महावितरण कंपनीने गुरुवारपासून अंमलबजावणी सुरू केली आहे.

एक लाखांवर कृषिपंपांना मिळणार १२ तास वीज
शेतकऱ्यांना दिलासा : मुख्यमंत्र्यांच्या घोषणेची अंमलबजावणी सुरू
यवतमाळ : कृषिपंपांना दिवसा १२ तास वीज देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेची जिल्ह्यात वीज महावितरण कंपनीने गुरुवारपासून अंमलबजावणी सुरू केली आहे. मात्र सध्या तरी आठवड्यात तीन ते चारच दिवस दिवसा वीज देणे शक्य होणार असल्याचे सांगण्यात आले.
पावसाने दडी मारल्यामुळे पिके धोक्यात आली आहे. त्यामुळे पुढील तीन महिने राज्यात दररोज सलग बारा तास वीज पुरवठा करण्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि उर्जामंत्र्यांनी मंगळवारी घेतला. या निर्णयांची अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व जिल्ह्यांना देण्यात आले. त्यानुसार यवतमाळ जिल्ह्यातही शेतीला बारा तास वीज पुरवठा निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरूवात झाली.
याचा फायदा जिल्ह्यातील एक लाख पाच हजार २२ कृषीपंपांना होणार आहे. जिल्ह्याला लागणाऱ्या एकूण वीजेच्या २० ते २२ टक्के वीज ही कृषीपंपांना लागते. यासाठी पूर्वी रात्री असणारे वेळापत्रकही बदलले असून आता रात्री ११.३० ते सकाळी ११.३० आणि सकाळी ११.३० ते रात्री ११.३० असे नवीन बारा-बारा तासांचे वेळापत्रक केले आहे. वीज पुरवठा करताना कोणत्याही तांत्रिक कारणामुळे वीज पुरवठा खंडीत झाल्यास दुसऱ्या दिवशी तेवढा वेळ वाढवून देण्यात येणार आहे. म्हणजे बारा तांसाऐवजी तांत्रिक अडचणीमुळे दहा तासच आज वीज पुरवठा करण्यात आला तर उद्या दोन तास वाढवून चौदा तास वीज पुरवठा अशा भागात करण्यात येणार आहे. तसेच काही भागात वीज पुरवठ्यामध्ये अडचण आल्यास अशावेळी गावठाण फिडरवर भारनियमन केले जाईल.
याबाबतचे सर्व अधिकार त्या-त्या परिसरातील कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले आहे. दर तासाला रिडींग घेण्यात येणार असल्याने कुठे किती वीज लागत आहे, याची माहिती मिळेल. यवतमाळ जिल्ह्यात सध्या जवळपास दोन लाख हेक्टर जमिन सिंचनाखाली आहे. सध्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार वीज पुरवठा करण्यात आल्यास २५ टक्के जमिनीवर सिंचन होईल. यामध्ये खरीप पिकांना याचा फायदा होणार आहे. (प्रतिनिधी)
रात्रीचे शेड्यूल राहीलच
मुख्यमंत्र्यांनी शेतीला बारा तास अखंड वीज पुरवठा आणि तोही सकाळी साडेपाच ते सायंकाळी साडेपाच या वेळात करण्याची घोषणा केली. जेणेकरून शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे रात्रभर शेतात जागावे लागू नये. परंतु महावितरणकडून या वेळापत्रकाला सध्या तरी खो दिल्याचे दिसून येत आहे. कारण त्यांनी साडेअकरा ते साडेअकरा असे वेळापत्रक सध्या सांगितले आहे. आठवड्यातील चार दिवस रात्री आणि तीन दिवस दिवसाने किंवा तीन दिवस रात्री आणि चार दिवस दिवसाने हे वेळापत्रक राबविले जाईल. आठवडाभर दिवसानेच वीज देणे शक्य नसल्याचे सांगण्यात येते.