टोळीयुद्धातून एकाचे अपहरण
By Admin | Updated: June 23, 2014 00:19 IST2014-06-23T00:19:59+5:302014-06-23T00:19:59+5:30
कारागृहात झालेल्या मारहाणीचा वचपा काढण्यासाठी येथील गुन्हेगारी वर्तुळात सक्रिय एका सदस्याचे विरोधी टोळीने अपहरण केले. ही घटना येथील पिंपळगाव येथील रोहिलेबाबा वस्तीजवळ शनीवारी

टोळीयुद्धातून एकाचे अपहरण
पिंपळगावातील घटना : कारागृहातील मारहाणीच्या घटनेचा वचपा
यवतमाळ : कारागृहात झालेल्या मारहाणीचा वचपा काढण्यासाठी येथील गुन्हेगारी वर्तुळात सक्रिय एका सदस्याचे विरोधी टोळीने अपहरण केले. ही घटना येथील पिंपळगाव येथील रोहिलेबाबा वस्तीजवळ शनीवारी रात्री ११.३० वाजता घडली. या घटनेने यवतमाळात पुन्हा एकदा टोळी युध्दाचा भडका उडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
गौरव ऊर्फ गुंठा राऊत (२७) रा. पिंपळगाव असे अपहरण झालेल्याचे नाव आहे. शरीर दुखापतीच्या एका गंभीर गुन्ह्यात जिल्हा कारागृहात गुंठा हा बंदिस्त होता. त्याला नुकतेच जामिनावर सोडण्यात आले. शनिवारी रात्री तो तीन ते चार मित्रांसह घराकडे जात होता. दरम्यान, मागावर असलेल्या प्रवीण दिवटे, विक्की कन्नाके आणि गोलू पारधी तिघेही रा. यवतमाळ हे स्कॉर्पिओ (एमएच २९ - १६५६) या वाहनाने तेथे आले. यावेळी त्यांनी गुंठा आणि त्याच्या मित्रावर धारदार तलवार व चाकूने हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला. ही बाब लक्षात येताच गुंठा आणि त्याचे मित्र पळायला लागले. यावेळी गुंठा हा त्यांच्या हाती लागला. संबंधितांनी त्याला स्कार्पिओ वाहनात कोंबले. तसेच तेथून गुंठासह भरधाव निघून गेले. गुंठाला मारहाण करून आणि तंबी देऊन संबंधित तिघेजण त्याला सोडतील अशी अपेक्षा त्याच्या मित्रांना होती. मात्र घटनेला १२ तास उलटूनही गुंठा परत न आल्याने अखेर याप्रकरणी सुरज गुप्ता रा. अप्सरा टॉकीज चौक याने शहर पोलिसात तक्रार दिली. त्यावरून प्रवीण दिवटेसह तिघांवर जीवे मारण्याचे उद्देशाने अपहरण आणि दहशत माजविण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सुरूवातीला गुंठाचे अपहरण हे बनावट असावे, असा अंदाज पोलिसांचा होता. प्रवीण हा गावात नाही तर गोलू पारधी हा नुकताच जामिनावर आला. त्यामुळे ही घटना बनावट असल्याचा युक्तिवाद केला जात होता. तेव्हा तक्रारकर्त्या सुरज गुप्ता याने गुंठा हा शरीर दुखापतीच्या गंभीर गुन्ह्यात येथील कारागृहात होता. त्यावेळी अक्षय राठोड आणि गुंठाने दिवटे समर्थक गोलू पारधी याला बेदम मारहाण केली. तसेच गुंठा आणि प्रवीण याच्यात पैशाचा वाद होता, अशी माहिती दिली. या दोन्ही बाबींचा वचपा काढण्यासाठीच ही घटना घडल्याच्या बाबीवर तो ठाम होता. एसडीपीओ राहुल मदने यांनी अखेर गुन्हा नोंदविला. (स्थानिक प्रतिनिधी)