एक कोटींची घरकुले लालफितीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 23:37 IST2017-12-28T23:37:47+5:302017-12-28T23:37:58+5:30
तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या सुकळी जहागीर येथील नागरिकांना दोन वर्षात एकही घरकूल मिळाले नाही. एक कोटी रुपयांची ही घरकूल योजना लालफितशाहीत अडकली असून लाभार्थ्यांना उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे.

एक कोटींची घरकुले लालफितीत
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या सुकळी जहागीर येथील नागरिकांना दोन वर्षात एकही घरकूल मिळाले नाही. एक कोटी रुपयांची ही घरकूल योजना लालफितशाहीत अडकली असून लाभार्थ्यांना उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे.
उमरखेड पंचायत समिती अंतर्गत ९३ ग्रामपंचायती आहे. या सर्व गावांना सामान्य प्राथमिक यादी प्रमाणे घरकूल योजनेचा लाभ मिळाला. परंतु सुकळी जहागीर, अमानपूर, चिल्ली या तीन गावातील लाभार्थ्यांना दोन वर्षांपासून एकही घरकूल मिळाले नाही. तीन गावातील सुमारे १०० घरकुलाचे फाईल सामान्य प्राथमिक यादीप्रमाणे गतवर्षी मंजूर झाल्याची माहिती नागरिकांनी दिली. परंतु अद्याप एकाही लाभार्थ्याला घरकुलाचा हप्ता मिळाला नाही. सुकळी, अमानपूर, चिल्ली हे गाव आॅनलाईन र्फोमेशन न झाल्यामुळे तुमचे घरकूल मंजूर नाही, अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जाते.
गत १५ वर्षापूर्वी सुकळी, चिल्ली व अमानपूर ही तीन गावे मिळून गट ग्रामपंचायत होती. त्यानंतर विभाजन झाले. तीनही गावांना स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा मिळाला. परंतु तेव्हापासून आजपर्यंत या गावांची आॅनलाईन नोंदच केली नाही. त्यामुळे लाभार्थी घरापासून वंचित आहेत. प्रशासनाने सुधारणा करून तीनही गावांना न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा आहे.
उपोषणाचा इशारा
गत दोन वर्षांपासून घरकुलाची प्रतीक्षा करणाऱ्या लाभार्थ्यांनी आता उपोषणाचा इशारा दिला आहे. १५ जानेवारीपासून आमरण उपोषणाला बसणार असल्याचे सुकळीचे माजी सरपंच चुन्नुमिया जागीरदार यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनातून दिले आहे. गावकरी हक्काच्या घरकुलापासून वंचित असल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.