तरुणाच्या खुनात एकास अटक
By Admin | Updated: December 2, 2015 02:36 IST2015-12-02T02:36:56+5:302015-12-02T02:36:56+5:30
दारव्हा तालुक्यातील वडगाव गाढवे येथील तरुणाच्या खून प्रकरणात गावातीलच एका तरुणाला लाडखेड पोलिसांनी अटक केली.

तरुणाच्या खुनात एकास अटक
सोनखास : दारव्हा तालुक्यातील वडगाव गाढवे येथील तरुणाच्या खून प्रकरणात गावातीलच एका तरुणाला लाडखेड पोलिसांनी अटक केली. विशेष म्हणजे या प्रकरणात वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रथम सदर तरुणाच्या दोन काकांनाच ताब्यात घेतले होते.
वडगाव गाढवे येथील अडाण नदीच्या पात्रात शुक्रवारी सकाळी गावातीलच मंगेश उत्तम सुरजुसे (२२) या तरुणाचा मृतदेह आढळला होता. त्याच्या चेहऱ्यावर फावड्याने व दगडाने मारहाण केल्याचे दिसून आले. पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून संशयावरून मंगेशच्या दोन काकांना ताब्यात घेतले होते. मात्र तपासात या दोघांनीही खून केला नसल्याचे पुढे आले. त्यावरून पोलिसांनी अधिक तपास केला असता गावातीलच गजानन मारोतराव बावणे (३८) याला ताब्यात घेतले. त्याला बोलता केले असता या खुनाची कबुली दिली. गजानन हा अडाण नदीच्या पात्रातून रेती उत्खनन करणाऱ्या वाहन चालकांकडून पैसे वसूल करीत होता. मंगेश रेतीसाठी ट्रॅक्टर घेऊन गेला असता त्यालाही पैशाची मागणी केली. मात्र मंगेशने पैशास नकार देत पोलिसांना माहिती देण्याची धमकी दिली. त्यामुळेच गजानने फावडे व दगडाने खून केल्याचे पुढे आले.
ही कारवाई लाडखेडचे ठाणेदार नरेश रणधीर, जमादार गजानन शेजूळकर, स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राजू वाटाणे, वासू साठवणे, हरीश राऊत, सुरेंद्र वाकोडे, सतीश गजभिये यांनी केली. (वार्ताहर)