‘चाईल्ड लाईन’मुळे ओमप्रकाश पोहोचला घरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 21:58 IST2017-12-11T21:58:10+5:302017-12-11T21:58:24+5:30
येथील बसस्थानकात एक मुलगा बेवारस फिरत असल्याची माहिती चाईल्ड लाईन सदस्यांना मिळाली.

‘चाईल्ड लाईन’मुळे ओमप्रकाश पोहोचला घरी
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : येथील बसस्थानकात एक मुलगा बेवारस फिरत असल्याची माहिती चाईल्ड लाईन सदस्यांना मिळाली. त्यांनी घटनास्थळ गाठून त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता तो कोणतीच माहिती देत नव्हता. त्यामुळे त्याला महिला बालकल्याण समितीपुढे सादर केल्यानंतर त्याने महत्प्रयासाने घरची माहिती दिली.
ओमप्रकाश हरिभाऊ अगलधरे (१३) असे त्याचे नाव असून तो लोणी-घटणा (ता. घाटंजी) येथील हा मुलगा असल्याचे स्पष्ट झाले. बालकल्याण समितीने नंतर त्याच्या आई-वडिलांशी संपर्क करून माहिती दिली. मुलाच्या शोधात भटकत असलेल्या आई-वडिलांनी तत्काळ बाल कल्याण समितीचे कार्यालय गाठले. ओमप्रकाशला एक भाऊ व दोन बहिणी आहे. त्याला दारव्हा तालुक्यातील आश्रमशाळेत टाकण्यात आले होते. तो सातवीत शिकत होता. मात्र अचानक आठ दिवसांपूर्वी तो आश्रमशाळेतून गायब झाला होता.
याप्रकरणी हरिभाऊ अगलधरे यांनी दारव्हा पोलीस ठाण्यात मुलगा हरविल्याची तक्रार दिली होती. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी ओमप्रकाश यवतमाळ बस्थानकावर भटकत असल्याची माहिती चाईल्ड हेल्पलाईनच्या टोल फ्री क्रमांकावर आली. त्यावरून स्वयंसेवक प्रदीप शेंडे सहकाºयासह तेथे पोहोचले. त्यांनी ओमप्रकाशला शहर ठाण्यात आणले. मात्र, तो चौकशीला प्रतिसाद देत नसल्याने त्याला महिला बालकल्याण समितीकडे देण्यात आले. रागात घराबाहेर पडलेल्या ओेमप्रकाशला पुन्हा कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आले. वाट चुकलेला मुलगा केवळ एका फोन कॉलमुळे घरी पोहोचला.