अहो आश्चर्य... शौचालय चोरीस गेले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 21:51 IST2017-08-24T21:50:52+5:302017-08-24T21:51:43+5:30
दुचाकी, चारचाकी चोरीस गेल्याची तक्रार आपण नेहमी ऐकतो. पण सिमेंट काँक्रिटचे शौचालय चोरीस गेल्याची तक्रार ऐकून सर्वांना धक्का बसेल.

अहो आश्चर्य... शौचालय चोरीस गेले !
अखिलेश अग्रवाल ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : दुचाकी, चारचाकी चोरीस गेल्याची तक्रार आपण नेहमी ऐकतो. पण सिमेंट काँक्रिटचे शौचालय चोरीस गेल्याची तक्रार ऐकून सर्वांना धक्का बसेल. परंतु पुसदमध्ये शौचालय चोरीस गेल्याची तक्रार एका नगरसेवकाने नगराध्यक्षांकडे केली. परिणामी पुसद नगरपरिषदेचा अजब कारभार उघडकीस आला.
पूस नदीतीरावर कुस्ती दंगल बांधाजवळ नगरपरिषदने शौचालय बांधले होते. नगरपरिषदेच्या मालकीचे हे शौचालय काही दिवसांपासून दिसेनासे झाले. लाखो रुपये खर्च करून सुभाष वॉर्ड व नूर कॉलनीतील नागरिकांच्या सुविधेसाठी सार्वजनिक शौचालय बांधले होते. परिसरातील बहुतेक नागरिकांची परिस्थिती जेमतेम असल्याने त्या परिसरातील नागरिक या शौचालयाचा वापर करीत होते. परंतु शौचालय अचानक चोरीस गेल्याने त्या भागातील नागरिकांपुढे प्रश्न निर्माण झाला आहे.
एकीकडे केंद्र व महाराष्ट्र शासन स्वच्छता अभियानांतर्गत कोट्यवधी रुपये खर्चत आहेत. तर दुसरीकडे अचानक शौचालय गायब झाल्याने नागरिकांना उघड्यावर बसण्याची वेळ आली आहे. या चोरीस गेलेल्या सार्वजनिक शौचालयासंबंधी चौकशी करून हा विषय येणाºया सभेत किंवा सर्वसाधारण सभेत ठेवून दोषींवर कारवाईची मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक निशांत बयास यांनी केली आहे.
पुसद नगरपरिषदेत मुख्याधिकाºयांची पूर्णत: हुकूमशाही आहे. नगरपरिषदेत नगरसेवकांना विश्वासात न घेता मुख्याधिकारी कारभार करीत आहे. नगरपरिषदेत कोणाचेच नियंत्रण राहिले नाही.
- निशांत बयास
नगरसेवक, पुसद