अधिकाऱ्यांनी स्वत: जनतेच्या तक्रारी स्वीकाराव्या

By Admin | Updated: June 3, 2015 00:01 IST2015-06-03T00:01:11+5:302015-06-03T00:01:11+5:30

नागरिक आपल्या समस्या तक्रारिंच्या स्वरूपात लोकशाही दिनात दाखल करीत असतात.

The officials themselves should accept public complaints | अधिकाऱ्यांनी स्वत: जनतेच्या तक्रारी स्वीकाराव्या

अधिकाऱ्यांनी स्वत: जनतेच्या तक्रारी स्वीकाराव्या

सचिंद्र प्रताप सिंह : बचत भवन येथे लोकशाही दिन कार्यक्रम, खासगी शाळांनी फी निश्चित करण्याच्या सूचना
यवतमाळ : नागरिक आपल्या समस्या तक्रारिंच्या स्वरूपात लोकशाही दिनात दाखल करीत असतात. बरेचदा सदर तक्रारींवर तालुकास्तरीय लोकशाही दिनातच अंतिम कार्यवाही होणे अपेक्षित असताना ती होत नाही. अशा तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली जाईल. तसेच अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यालयात आलेल्या जनतेसोबत स्वत: चर्चा करावी, त्यांची समस्या समजून घ्यावी आणि त्वरित निराकरण करावे, केवळ लिपिकाच्या भरवशावर राहू नये, असे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, प्रभारी पोलीस अधिक्षक जे.बी.डाखोरे, अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, उपवनसंरक्षक प्रमोदचंद लाखरा, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, संतोष पाटील यांच्यासह विविध विभागाचे जिल्हा प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
तालुकास्तरीय लोकशाही दिनात तक्रार सादर झाल्यानंतर सदर तक्रारीचे निराकरण होण्यासारखे असेल तर तेथेच झाले पाहिजे. नाहक नागरिकांना जिल्हास्तरीय लोकशाही दिनात यावे लागू नये. अधिकाऱ्यांनी तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास असे होत असल्यास जबाबदारी निश्चित करून कार्यवाही करू, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. शासकीय कार्यालयांमध्ये नागरिक तक्रारी घेवून येत असताना कार्यालयातील अधिकाऱ्यांनी स्वत: त्या नागरिकांसोबत चर्चा करावी. तक्रारी लिपिकाच्या भरवशावर ठेवू नये.
लोकशाही दिनात खासगी शाळा अवाढव्य फी आकारत असल्याची तक्रार सादर झाली. शाळांच्या फी शाळा व्यवस्थापन, पालक समितीच्या सभेत निश्चित करून शिक्षण उपसंचालकांची या फी आकारणीस मान्यता घ्यावी. सर्व खासगी शाळांना पत्र देवून फी निश्चितीबाबतची कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षण विभागास केल्या. (प्रतिनिधी)

लोकशाही दिनी अधिकाऱ्यांना सुटी नाही
लोकशाही दिनात विविध विभागांशी संबंधित तक्रारी प्राप्त होत असतात. या तक्रारींवर चर्चा करून त्या निकाली काढण्यासाठी संबंधित विभागाने या दिवशी उपस्थित असणे आवश्यक आहे. मात्र अनेक अधिकारी रजेवर असल्याने लोकशाही दिनात गैरहजर असतात. त्यामुळे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणाऱ्या जिल्हास्तरीय लोकशाही दिनाच्या दिवशी अधिकाऱ्यांना रजा घेता येणार नाही व संबंधीत विभागांनी अशी रजा देवू नये, असे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: The officials themselves should accept public complaints

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.