अधिकारी, तलाठ्यांचा तहसीलभोवती ठिय्या

By Admin | Updated: November 25, 2014 23:04 IST2014-11-25T23:04:22+5:302014-11-25T23:04:22+5:30

तालुक्यातील बहुतांश तलाठी व मंडळ अधिकारी आपल्या मुख्यालयाच्या ठिकाणी उपस्थित न राहता येथील तहसील कार्यालयाच्या अवतीभोवतीच फिरताना दिसतात. त्यामुळे ग्रामीण

Officers, Takhts surrounded the tehsil | अधिकारी, तलाठ्यांचा तहसीलभोवती ठिय्या

अधिकारी, तलाठ्यांचा तहसीलभोवती ठिय्या

वणी : तालुक्यातील बहुतांश तलाठी व मंडळ अधिकारी आपल्या मुख्यालयाच्या ठिकाणी उपस्थित न राहता येथील तहसील कार्यालयाच्या अवतीभोवतीच फिरताना दिसतात. त्यामुळे ग्रामीण भागातील ग्रामस्थांना तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांच्या शोधात भटकंती करावी लागत आहे. त्यांना वणीत येऊन आपल्या कामांचा निपटारा करवून घ्यावा लागत आहे.
तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना साजे नेमून देण्यात आले आहेत. संबंधित साजात पोहोचून त्यांनी शेतकरी आणि ग्रामस्थांची कामे करावीत, अशी अपेक्षा असते. मात्र त्यांच्या नियुक्तीच्या ठिकाणी अथवा त्यांच्या घरी जाऊनही तलाठी व मंडळ अधिकारी ग्रामस्थांना भेटतच नाहीत. परिणामी ग्रामस्थ, शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे़ अनेक तलाठी शहरात किरायाने राहतात. अनेकदा खोली बदल होत असल्याने ग्रामस्थांना ते गवसतच नाहीत. अशावेळी तर ग्रामस्थ, शेतकऱ्यांची चांगलीच परवड होताना दिसून येते.
येथील तहसील कार्यालयात गेल्या चार-पाच महिन्यांपूर्वी नव्याने रूजू झालेले काही मंडळ अधिकारी, तर तहसील कार्यालयातच ठिय्या मांडून दिसतात. काही मंडळ अधिकारी व अव्वल कारकून यांचे मागे खांदेपालट झाले. मंडळ अधिकारी शिरस्तेदार, तर शिरस्तेदार मंडळ अधिकारी झाले. मात्र अशा मंडळ अधिकाऱ्यांच्या अंगातून अद्याप शिरस्तेदार पदच गेलेच नसल्याचे दिसून येते. त्यामुळे तलाठ्यांना फेरफार रजिस्टरवर मंडळ अधिकाऱ्यांची मंजुरी घेण्याकरिता रजिस्टर घेऊन तहसील कार्यालय गाठावे लागते. परिणामी मंडळ अधिकारी अन् तलाठीही साजात आढळत नाही.
तहसील कार्यालयातच काही मंडळ अधिकारी फेरफार मंजूर करतात़ काही कर्तव्यदक्ष मंडळ अधिकारी आपल्या मंडळातील अचूक माहिती ठेवतात, मुख्यालयाला भेटीही देतात. ग्रामस्थ, शेतकऱ्यांच्या समस्या सोडवितात. मात्र काही मंडळ अधिकारी तर सतत तहसील कार्यालयाच्या भोवतीच फिरून आपल्या परिसराचा कारभार हाकतात, असे स्पष्ट होत आहे. तहसीमध्ये वावरणाऱ्या अशा मंडळ अधिकाऱ्यांना आपल्या मंडळातील समस्याच दिसत नाहीत. त्यामुळे एकाही शेतकऱ्याची समस्या सुटताना दिसत नाही.
काही मंडळ अधिकारी तहसील कार्यालयातच बसून राहत असल्याने काही कर्तव्यदक्ष तलाठ्यांना त्यांना शोधत तहसील कार्यालयाकडे धाव घ्यावी लागते. मंडळ अधिकारी मुख्यालयी उपस्थित राहत नसल्याने काही तलाठ्यांची दमछाक होत आहे़ अनेक व्यवहारांचे फेरफार लिहून तलाठ्याने ठेवले असताना आणि नियोजित २१ दिवसांचा कालावधी पूर्ण होऊनही शेतकऱ्यांचे फेरफार होत नाही़ त्यामुळे शेतकरी तलाठ्यावर रोष व्यक्त करतात़ त्याला काही तलाठीही दोषी असतात. तथापि त्यांच्या वरील अधिकारी म्हणून मंडळ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते़ तेच कर्तव्यदक्ष नसतील, तर महसूल मंडळाचे काय होणार, अशी चर्चा आता होत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Officers, Takhts surrounded the tehsil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.