अधिकाऱ्यांनी प्रत्येक शाळेला भेट देऊन मूल्यांकन करावे - डाॅ. शिवलिंग पटवे
By अविनाश साबापुरे | Updated: January 18, 2024 19:54 IST2024-01-18T19:54:07+5:302024-01-18T19:54:16+5:30
‘माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमाचा घेतला तालुकानिहाय आढावा

अधिकाऱ्यांनी प्रत्येक शाळेला भेट देऊन मूल्यांकन करावे - डाॅ. शिवलिंग पटवे
यवतमाळ : ‘माझी शाळा सुंदर शाळा’ अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील शाळांची १०० टक्के नोंदणी होणे आवश्यक आहे. सर्व अधिकाऱ्यांनी प्रत्येक शाळेला भेटी देऊन या उपक्रमाचे विहित कालावधीत मूल्यांकन करावे, अशा सूचना गुरुवारी शिक्षण उपसंचालक डाॅ. शिवलिंग पटवे यांनी दिल्या.
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ हे महत्वाकांक्षी अभियान यवतमाळ जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने अमरावती विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. शिवलिंग पटवे यांनी जिल्हा परिषदेत भेट दिली. यावेळी जिल्हा परिषदेत झालेल्या सभेत त्यांनी उपक्रमाच्या अंमलबजावणीबाबत तालुकानिहाय आढावा घेतला.
पीपीटीचे सादरीकरण
जिल्ह्यातील अभियानाच्या अमलबजावणीबाबत यावेळी शिक्षण उपसंचालक डाॅ. शिवलिंग पटवे यांच्यापुढे पीपीटी सादरीकरण करण्यात आले. जिल्ह्यातील शाळा या अभियानात अव्वल येऊन विभाग व राज्यस्तरावर पारितोषिकासाठी पात्र होतील, असा आशावाद शिक्षणाधिकारी किशोर पागोरे यांनी व्यक्त केला. आढावा सभेचे प्रास्ताविक उपशिक्षणाधिकारी राजू मडावी यांनी केले. उपस्थितांचे आभार उपशिक्षणाधिकारी डॉ. निता गावंडे यांनी मानले.