राळेगावात अधिकारी पोहोचले थेट नुकसानग्रस्त शेतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2021 05:00 IST2021-08-05T05:00:00+5:302021-08-05T05:00:27+5:30
प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या तोडून अळीसह नष्ट करणे, प्रतिएकर किमान सात ते आठ कामगंध सापळे लावणे, दहा टक्क्यांपेक्षा अधिक प्रादुर्भाव पात्या, फुले,बोंडे या भागात आढळल्यास कीटकनाशकांची सुरक्षित फवारणी करावी, असे शेतकऱ्यास सुचविण्यात आले. तहसीलदार डॉ. रवींद्र कानडजे यांच्या कक्षात तालुका कृषी अधिकारी मनीषा गवळी व पंचायत समिती कृषी अधिकारी रोशन गुलाले यांच्या उपस्थितीत मंडल अधिकारी व कृषी सहाय्यकांसह बैठक घेण्यात आली.

राळेगावात अधिकारी पोहोचले थेट नुकसानग्रस्त शेतात
लोकमत न्यूज नेटवर्क
राळेगाव : निधा येथील शेतकरी ज्ञानेश्वर मुडे यांच्या २७ एकर शेतातील काही पऱ्हाटीच्या फुलांवर बोंड अळी आढळून आली होती. त्यामुळे ते हादरून गेले. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच यवतमाळ येथील वरिष्ठ कृषी अधिकाऱ्यांनी मुडे यांच्या शेतात हजेरी लावून शेतकऱ्यांना सल्ला मार्गदर्शन केले.
यावेळी जिल्हा कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर एस. यू. नेमाडे, कीटकशास्त्रज्ञ पी. एन. मगर यांनी भेट दिली. त्यांच्यासोबत मंडल कृषी अधिकारी आर. व्ही. ताकसांडे, कृषी सहाय्यक जे. एस. पचारे, पी. एम. धुमाळे, टी. एस. मेश्राम हजर होते.
प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या तोडून अळीसह नष्ट करणे, प्रतिएकर किमान सात ते आठ कामगंध सापळे लावणे, दहा टक्क्यांपेक्षा अधिक प्रादुर्भाव पात्या, फुले,बोंडे या भागात आढळल्यास कीटकनाशकांची सुरक्षित फवारणी करावी, असे शेतकऱ्यास सुचविण्यात आले.
तहसीलदार डॉ. रवींद्र कानडजे यांच्या कक्षात तालुका कृषी अधिकारी मनीषा गवळी व पंचायत समिती कृषी अधिकारी रोशन गुलाले यांच्या उपस्थितीत मंडल अधिकारी व कृषी सहाय्यकांसह बैठक घेण्यात आली. सर्व माहिती जाणून घेत आवश्यक त्या सूचना संबंधितांना करण्यात आल्या.