ग्रामस्तरावरील पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिलासा द्यावा
By Admin | Updated: December 21, 2015 02:44 IST2015-12-21T02:44:34+5:302015-12-21T02:44:34+5:30
शासनाच्या विविध योजना शेतकरी आणि ग्रामस्थांपर्यंत पोहोचल्या नसल्याने जनतेचा प्रशासनावरील विश्वास कमी झाला आहे.

ग्रामस्तरावरील पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिलासा द्यावा
किशोर तिवारी : राळेगाव येथे चेतना अभियानांतर्गत मार्गदर्शन, ग्रामस्तरीय समितीच्या कार्याविषयी दिली माहिती
राळेगाव : शासनाच्या विविध योजना शेतकरी आणि ग्रामस्थांपर्यंत पोहोचल्या नसल्याने जनतेचा प्रशासनावरील विश्वास कमी झाला आहे. ग्रामस्तरीय समितीचे सदस्य, सरपंच, पटवारी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, मुख्याध्यापक, कृषी सहाय्यक आदींनी शेतकऱ्यांना मदत करावी, त्यांचे प्रश्न समजावून घेऊन दिलासा द्यावा, असे आवाहन शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केले.
बळीराजा चेतना अभियानांतर्गत येथे झालेल्या पहिल्या ग्रामस्तरीय समितीच्या सदस्यांना ते मार्गदर्शन करीत होते. प्रसंगी मंचावर सहाय्यक जिल्हाधिकारी दीपक मिना, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड, ठमके, जिल्हा परिषद सदस्य अर्चना राऊत, सुरेश मेश्राम, उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, तहसीलदार सुरेश कवळे, गटविकास अधिकारी विनोद
खेडकर, अशोक केवटे, उपविभागीय पोलीस अधिकारी जाधव आदी उपस्थित होते.
किशोर तिवारी पुढे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळ जिल्ह्याकरिता अनेक निर्णय घेतले आहे. ग्रामस्तरीय समित्या स्थापन करून एक लाख रुपये उपलब्ध करून देण्यात आले. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना त्यातून कर्ज उपलब्ध करून द्यावे. पटवाऱ्याकडे अर्ज देताच पुढील कारवाई करावी, ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्य रक्षणाची जबाबदारी आरोग्य विभागाने घ्यावी, आजारी शेतकऱ्याची पुरेपूर काळजी घेतली जावी, प्रशासन व शेतकरी यांच्यातील दुवा म्हणून या ग्रामस्तरीय समितीने आपली भूमिका पार पाडावी, त्यांना आधार द्यावा शासना त्यांच्यासोबत आहे, असे ते म्हणाले. सरपंचांनी समिती सदस्यांच्या सहकार्यांनी कर्जबाजारी व अडचणीत असलेल्या शेतकऱ्यावर बारीक लक्ष ठेऊन गावात एकही शेतकरी आत्महत्या
होणार नाही याकड लक्ष ठेवण्याचे आवाहन केले.
ग्रामस्तरीय समितीने कशा पद्धतीने कार्य करावे याबाबत तिवारी यांनी मार्गदर्शन केले. राजेश काळे यांनी संचालनाची जबाबदारी पार पाडली. याप्रसंगी परिसरातील विविध गावचे सरपंच, उपसरपंच, गावकरी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)