२३ लाखांचा गंडा : शेंद्रीच्या आठ शेतकऱ्यांची तक्रार दारव्हा : पीक कर्जाच्या नावाखाली शेतकऱ्यांना तब्बल २३ लाखांचा गंडा घालणाऱ्या बँकेच्या तथाकथित दलालाविरुद्ध अखेर दारव्हा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेतले आहे. तालुक्यातील शेंद्री येथील आठ शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची तक्रार आहे.सुरज गोविंदराव देवरे (३०) रा. दत्तनगर दारव्हा असे दलालाचे नाव आहे. त्याने दारव्हा तालुक्यातील शेंद्री येथील छगन मधुकर वानखडे यांच्यासह आठ जणांची फसवणूक केली होती. बँकेचे पीक कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली त्याने या आठ शेतकऱ्यांकडून २३ लाख ५ हजार रुपये घेतल्याची तक्रार आहे. विशेष म्हणजे सुरजने शेंद्री परिसरातील अनेक शेतकऱ्यांना गंडा घातला होता. परंतु पोलिसात तक्रार करण्यात आली नव्हती. शेतकरी आपले पैसे परत मिळतील या आशेने तक्रार करीत नव्हते. अखेर शेंद्री येथील छगन वानखडे व आठ जणांनी दारव्हा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून देवरे विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविला. (प्रतिनिधी) ‘धनंजय’नेही केली होती सुरजची तक्रार सुरज देवरे या दलालाने दारव्हा तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे ३० मे रोजी जिल्हाधिकारी कक्षासमोर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या धनंजय वानखेडेच्या प्रकरणाशीही सुरज देवरेचा संबंध आहे. सुरजने केलेल्या शेतकऱ्यांच्या फसवणुकीची तक्रार घेऊन धनंजय दारव्हा ठाण्यात गेला होता. परंतु तेथे तक्रार घेतली नाही. त्यानंतर त्याने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन हा प्रकार सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथेच त्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली होती.
शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या दलालावर गुन्हा
By admin | Updated: June 16, 2016 02:47 IST