संचालक मंडळावर गुन्हा

By Admin | Updated: August 18, 2014 23:49 IST2014-08-18T23:49:43+5:302014-08-18T23:49:43+5:30

गुंतवणूकदार आणि अभिकर्त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी येथील महिला ग्रामीण सहकारी पतसंस्था अध्यक्ष, उपाध्यक्षांसह संचालक मंडळावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Offense on Board of Directors | संचालक मंडळावर गुन्हा

संचालक मंडळावर गुन्हा

राळेगाव : गुंतवणूकदार आणि अभिकर्त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी येथील महिला ग्रामीण सहकारी पतसंस्था अध्यक्ष, उपाध्यक्षांसह संचालक मंडळावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, कारवाईच्या मागणीसाठी सुरू करण्यात आलेल्या उपोषणाची सांगता झाली.
संस्थेच्या अध्यक्ष लता विनोद वनकर, त्यांचे पती तथा संस्थेचे सर्वेसर्वा विनोद वनकर, व्यवस्थापक हेमंत वनकर, संजय कोटंबकर, बळवंत मून यांच्यावर भादंवि ४२०, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या पतसंस्थेने गुंतवणूकदारांना त्यांची रक्कम देण्यास टाळाटाळ सुरू केली होती. शिवाय अभिकर्त्यांनाही टोलविले जात होते. याविरोधात गेली तीन-चार महिन्यांपासून अभिकर्ते व ग्राहक संघर्ष समितीने आंदोलनात्मक पाऊल उचलले. तहसीलदार, पोलीस ठाणे, जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदने दिली. परंतु प्रत्येक ठिकाणी उडवाउडवीची उत्तरे दिली जात होती. त्यामुळे गेली पाच दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले होते. विजयराज सेगेकर यांनी पुढाकार घेत अ‍ॅड. प्रफुल्ल चौहाण आणि अ‍ॅड. फिडेल बायदानी यांच्या मदतीने प्रशासनाशी चर्चा करून उपोषणकर्त्यांच्या मागण्या मान्य करण्याचे ठरविले. आॅडिटची कार्यवाही ३१ आॅगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे सहायक निबंधक यांनी शासनातर्फे लेखी दिले. यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
उपोषणात योगेश बनसोड, मनोज गुजरकर, विशाल डडमल, रामेश्वर एंबडवार, राहुल ठाकरे, आगा हुसेन शेख, चंद्रकांत बेसेकर, वसंत पोटफोडे, सुनील संगेवार, ईश्वरलाल जयस्वाल, कृष्णराव डफाडे, पुरुषोत्तम आवारी, पवन केवटे, गजानन सरदार, रजनी महाजन आदी सहभागी झाले होते. विजयराज सेगेकर यांच्या हस्ते उपोषण सोडविण्यात आले. सदर पतसंस्थेत हजारो गरीब कुटुंबाने गुंतवणूक केली आहे. यात छोट्या व्यावसायिकांचाही समावेश आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Offense on Board of Directors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.