दुसरा घरठाव करणाऱ्या पोलिसावर गुन्हा
By Admin | Updated: November 7, 2016 01:17 IST2016-11-07T01:17:05+5:302016-11-07T01:17:05+5:30
दोन महिन्यातच दुसरे लग्न : वर्धेतील तरूणीशी आॅनलाईन प्रेम

दुसरा घरठाव करणाऱ्या पोलिसावर गुन्हा
दोन महिन्यातच दुसरे लग्न : वर्धेतील तरूणीशी आॅनलाईन प्रेम
यवतमाळ : जिल्हा पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या एका शिपायाने पहिल्या लग्नानंतर दोन महिन्यानेच दुसरा संसार थाटल्याचा प्रकार उघडकीस आला. समाजात रीतिरिवाजाप्रमाणे लग्न झाल्यानंतर दोन महिन्यांनी आॅनलाईनवर प्रेम जडलेल्या प्रेयसीसोबतसुध्दा नोंदणी विवाह केला. फसवणूक झाल्याने लक्षात येताच आॅनलाईनवर पत्नी झालेल्या मुलीने पोलीस तक्रार दिली. त्यावरून वडगाव पोलिसांनी या पोलीस शिपायावर गुन्हा दाखल केला आहे.
कृष्णा विनायक पवार (२२) रा. पोलीस मुख्यालय यवतमाळ, असे आरोपी पोलीस शिपायाचे नाव आहे. कृष्णाचे त्याच्या वडिलांनी जून महिन्यात आशा राठोड हिच्यासोबत लग्न लावून दिले. कृष्णा हा मुळचा अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी अल्हनवाडी तांडा येथील राहणारा आहे. त्याने यवतमाळ पोलीस दलातच कार्यरत असताना वर्धा येथील २० वर्षीय तरुणीशी आॅनलाईनवर सुत जमविले. त्या तरुणीने हा प्रकार तिच्या कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर या दोघांनी २ आॅगस्ट रोजी नोंदणी विवाह केला. नोंदणी विवाहानंतर कृष्णा आणि त्याची प्रेयसी झालेली पत्नी यवतमाळात राहू लागले. लग्नानंतर आरोपी कृष्णाने तिला तब्बल दीड महिना लॉजवर ठेवले. नंतर यवतमाळच्या आर्णी मार्गावर खोली भाड्याने घेतली. दरम्यान, माहेरावरून पैसे आणण्यासाठी कृष्णाने तगादा लावने सुरू केले. त्याने वर्धेवरून आणालेले ५० हजार रुपये खर्च केले. तरीसुध्दा त्याचा त्रास कमी झाला नाही. शेवटी त्याच्या जाचाला कंटाळून सदर युवती वर्धा येथे परत आली.
दरम्यान, कृष्णाचे आशा राठोड नामक महिलेशी लग्न झाल्याचा प्रकार उघड झाला. त्यानंतर आचल कृष्णा पवार हिने कृष्णा व त्याच्या कुटुंबीयानी फसवणूक केल्याची तक्रार वडगाव रोड पोलीस ठाण्यात दिली. यावरून पोलीसांनी कृष्णा पवार याच्यासह विनायक पवार, ज्योती विनायक पवार, पवनकुमार राठोड, गोकु ळ राठोड, बळीराम राठोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वडगाव रोड पोलिसांनी सुरू केला आहे. (कार्यालय प्रतिनिधी)