OBCs should exit the caste box | ओबीसींनी जातीच्या चौकटीतून बाहेर निघावे
ओबीसींनी जातीच्या चौकटीतून बाहेर निघावे

ठळक मुद्देएस.जी. माचनवार । स्मृती पर्वात व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जातीच्या चौकटीतून जोपर्यंत बाहेर पडणार नाही तोपर्यंत ओबीसींची प्रगती शक्य नाही. ओबीसींना आपल्या हक्कासाठीचा लढा अधिक तीव्र करण्याची गरज आहे, असे विचार ओबीसी पिछडा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एस.जी. माचनवार यांनी मांडले.
येथील आझाद मैदानात स्मृती पर्व अंतर्गत भारतीय पिछडा (ओबीसी) शोषित संघटनच्या संयोजनात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. ‘जातीकडून प्रवर्गाकडे गेल्यानेच ओबीसींची आर्थिक, शैक्षणिक व राजकीय प्रगती शक्य आहे’ असा व्याख्यानाचा विषय होता. ज्ञानेश्वर गोरे अध्यक्षस्थानी होते.
एस.जी. माचनवार पुढे म्हणाले, पाच वर्षे आपण आंदोलनाच्या माध्यमातून सरकारशी भांडतो. परंतु निवडणुकांमध्ये केवळ जातीचा उमेदवार म्हणून आपण त्याला मतदान करतो. परिणामत: आपणच आपल्या पायावर धोंडा मारून घेत असतो. हे अधिक काळ चालणार नाही. ओबीसींच्या न्याय, हक्क व अधिकारासाठी लढणारा नेता आपल्याला निवडावा लागेल. महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आज खऱ्या अर्थाने स्वीकारण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. याच सत्रात अ‍ॅड. फारूक अहमद, मायक्रो ओबीसीचे नेते गोविंद दळवी आदींनी विचार मांडले. संचालन नीता दरणे यांनी केले. यावेळी मंचावर विलास काळे, लक्ष्मीकांत लोळगे, सुनीता काळे, राजेंद्र महाडोळे, माया गोरे, डॉ. संजय ढाकुलकर, दीपक वाघ, विठ्ठल नाकतोडे, विशाल पोले, खंडेश्वर कांबळे, बाबूसिंग कडेल, वैशाली फुसे, भानुदास केळझरकर आदी उपस्थित होते.

Web Title: OBCs should exit the caste box

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.