पोषण आहार कामगारांची दिवाळी जाणार अंधारात
By Admin | Updated: October 29, 2016 00:21 IST2016-10-29T00:21:26+5:302016-10-29T00:21:26+5:30
तोकड्या मानधनावर राबणाऱ्या शालेय पोषण आहार कामगारांच्या पदरात ऐन दिवाळीत निराशा पडली आहे.

पोषण आहार कामगारांची दिवाळी जाणार अंधारात
मानधनाची प्रतीक्षा : आॅनलाईन माहिती भरूनही देयकाला विलंब
यवतमाळ : तोकड्या मानधनावर राबणाऱ्या शालेय पोषण आहार कामगारांच्या पदरात ऐन दिवाळीत निराशा पडली आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने हे कामगार अडचणीत सापडले असून दिवाळी कशी साजरी करावी, हा त्यांच्यापुढे प्रश्न आहे.
पोषण आहार शिजविणाऱ्या कामगारांचे मानधन थकणे हा जिल्ह्यासाठी नवा मुद्दा नाही. यापूर्वीही दोन ते चार महिन्यांचे मानधन थकित राहण्याचे प्रकार घडले आहे. मात्र आता ऐन दिवाळीत पैसे मिळालेले नसल्याने मोठी कोंडी झाली आहे. पुसद पंचायत समितीमधील जिल्हा परिषद शाळांमध्ये पोषण आहार शिजविणाऱ्या कामगारांचे मानधन जुलै महिन्यापासून मिळालेले नाही. कमी-अधिक प्रमाणात हीच परिस्थिती इतरही तालुक्यांमध्ये आहे.
विशेष म्हणजे, पोषण आहारात कुठेही गैरप्रकार होऊ नये, यासाठी शासनाने या वर्षीपासून विशेष दक्षता घेतली आहे. दररोज किती विद्यार्थ्यांना आहार दिला, किती धान्य शिजविले, किती शिल्लक आहे याबाबतची माहिती दररोज आॅनलाईन मागविण्यात आली आहे. त्यानुसार, संबंधित शाळेतील शिक्षक दररोज पोषण आहाराबाबतची माहिती आॅनलाईन भरत आहेत. सुरुवातीला आॅनलाईन माहिती देण्यात अडचणी जाणवल्या तरी शिक्षकांनी आता त्यावर मात केली आहे. नियमाप्रमाणे सर्वच शिक्षक वेळेत माहिती पुरविण्यासाठी आटापिटा करताना दिसत आहे. या कामात त्यांना चांगले यशही मिळत असल्याचे दिसून येत आहे. परंतु तरीसुद्धा वरिष्ठांकडून नोंद घेतल्या जात नसल्याची खंत आहे.
शासनाच्या निर्देशानुसार रोजच्या रोज आहाराची माहिती देऊनही संबंधित कामगारांचे मानधन वेळच्या वेळी मिळणे दुरापास्त झाले आहे. तब्बल तीन-तीन महिने आहार शिजविणाऱ्या कामगारांचे पैसे थकित राहात आहेत.
मात्र, अशावेळी कामगारांच्या रोषाचा सामना शिक्षकांना करावा लागतो. काही दिवसांपूर्वी प्रशासनाने या संदर्भातील निधी थेट शाळांकडे वळता केला. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला होता. परंतु, जुलै महिन्यापासून पुन्हा मानधनाला विलंब होत आहे. ऐन दिवाळीत मानधन न मिळाल्याने पोषण आहार शिजविणाऱ्या कामगारांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
(स्थानिक प्रतिनिधी)
प्रशासन म्हणते, आलबेल
शालेय पोषण आहार अधीक्षक अलिकडेच रुजू झाले आहे. त्यामुळे जुने पेन्डींग मार्गी लावण्याचे प्रयत्न सुरू आहे. सध्या सप्टेंबरपर्यंतचे मानधन देण्यात आल्याचा दावाही प्रशासनाने केला आहे. मात्र कामगार मानधनाच्या प्रतीक्षेत आहे.