पोषण आहाराच्या धान्याची अफरातफर
By Admin | Updated: July 2, 2016 02:46 IST2016-07-02T02:46:52+5:302016-07-02T02:46:52+5:30
शालेय पोषण आहाराच्या साहित्यात अफरातफरीचा प्रकार गुरुवारी येथील जिल्हा परिषद शाळेत उघडकीस आला.

पोषण आहाराच्या धान्याची अफरातफर
शिक्षकात हमरीतुमरी : वडकी शाळेतील प्रकार
वडकी : शालेय पोषण आहाराच्या साहित्यात अफरातफरीचा प्रकार गुरुवारी येथील जिल्हा परिषद शाळेत उघडकीस आला. याच प्रकारावरून शिक्षकांमध्ये शिवीगाळीचा प्रकारही घडला. दरम्यान, या प्रकरणी कारवाईच्यादृष्टीने अहवाल तयार करण्यात आला आहे. यावर काय कारवई होते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.
राळेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या येथील शाळेत बुधवारी ४२ कट्टे तांदूळ, पाच कट्टे वटाणा, एक कट्टा डाळ, दहा बॉक्स सोयाबीनचे तेल दाखल झाले होते. यातील काही साहित्याची अफरातफर झाल्याची बाब काही लोकांच्या लक्षात आली. यानंतर चौकशी सुरू झाली. पोषण आहाराचे अधीक्षक दाभोळकर यांना विचारले असता, त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही.
जिल्हा परिषद सदस्य अर्चना विलास राऊत, उपसरपंच दिलीप कडू, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत पिपराडे, विलास राऊत, मुख्याध्यापक सलाम आदींनी प्राप्त झालेले साहित्य आणि प्रत्यक्षात असलेल्या साहित्याचे मोजमाप केले.
बुधवारी दाखल झालेल्या साहित्यामध्ये सात कट्टे तांदूळ, एक कट्टा वटाणा, सोयाबीन तेलाचा एक बॉक्स कमी आढळून आला. या प्रकाराचा पंचनामा करण्यात आला.
ही कारवाई सुरू असतानाच शिक्षकांमध्ये चांगलीच जुंपली. त्यांच्यात हमरीतुमरीचा प्रकार सुरू झाला. साहित्याच्या अफरातफरीमध्ये शाळेतीलच कुणाचा तरी हात असावा या निष्कर्षाप्रत पोहोचल्यानंतर अधीक्षकांनी याप्रकरणी कारवाई करणार असल्याचे सांगितले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणारे अधीक्षक प्रत्यक्ष तपासणीनंतर मात्र अनुत्तरीत झाले. दरम्यान, पोषण आहाराची अफरातफर करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशा सूचना जिल्हा परिषद सदस्य अर्चना राऊत यांनी यावेळी दिल्या. (वार्ताहर)