परिचारिकेची वैद्यकीय अधिकाऱ्यालाच मारहाण
By Admin | Updated: November 10, 2014 22:49 IST2014-11-10T22:49:46+5:302014-11-10T22:49:46+5:30
तालुक्यातील सवना ग्रामीण रुग्णालयात रात्री ८ वाजताच्या सुमारास कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याला येथीलच परिचारिकेने नातेवाईकांच्या मदतीने बेदम मारहाण केली. रुग्णालयात

परिचारिकेची वैद्यकीय अधिकाऱ्यालाच मारहाण
महागाव : तालुक्यातील सवना ग्रामीण रुग्णालयात रात्री ८ वाजताच्या सुमारास कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याला येथीलच परिचारिकेने नातेवाईकांच्या मदतीने बेदम मारहाण केली. रुग्णालयात पूर्ण वेळ उपस्थित राहून सेवा देणाऱ्याच वैद्यकीय अधिकाऱ्याला मारहाण झाल्याने ग्रामस्थांमध्ये संताप निर्माण झाला आहे. यातील दोषींवर कारवाईसाठी ग्रामस्थांनी रुग्णालय परिसरात सोमवारी सकाळी गर्दी केली होती.
शासकीय सेवेत नेहमीच वरिष्ठांकडून कनिष्ठांची प्रताडना केली जाते. सवना येथे मात्र उलट प्रकार पहावयास मिळाला. रविवारी येथील ग्रामीण रुग्णालयात एकाचवेळी दोन गंभीर स्वरूपाचे रुग्ण उपचारासाठी दाखल झाले. एकाने विष प्राशन केले होते तर गरोदर महिला तपासणीस आली होती. रुग्णाची स्थिती अतिशय नाजूक असल्याने वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन उके हे त्यांच्यावर उपचार करण्यात व्यस्त होते. तेवढ्यातच परिचारिका स्वत:च्या आईला घेऊन रुग्णालयात आली. तिने डॉक्टरांना आईची तपासणी करण्यास सांगितले. मात्र दोन्ही रुग्ण गंभीर स्वरूपाचे असल्याने त्यांच्यावर उपचार करने आवश्यक होेते. ही स्थिती समजून न घेता परिचारिकेने डॉक्टर सोबत वाद घालणे सुरू केले. उपस्थितांनी दोघांची समजूत काढली. त्यानंतर ती परिचारिका आपल्या आईला घेऊन घराकडे परत गेली.
यावरच ती परिचारिका थांबली नाही तर तिने आपल्या चार नातेवाईकांना सोबत घेऊन पुन्हा ग्रामीण रुग्णालय गाठले. येथे कामत व्यस्त असलेल्या डॉ. सचिन उके यांना काहीएक न विचारता त्या सर्वांनी मारहाण करणे सुरू केले. नेमका काय प्रकार घडतोय हे सुद्धा डॉक्टरच्या लक्षात आले नाही.
बराच वेळ मारहाण केल्यानंतर हे सर्व जण धमकावून निघुन गेले. या घटनेने धास्तावलेल्या डॉक्टरने कुठेच वाच्यता केली नाही. सकाळी हा मारहाणीचा प्रकार माहीत झाल्यानंतर ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली. सर्वांनी नेमका काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी ग्रामीण रुग्णालयाकडे धाव घेतली. रुग्णांच्या सेवेत सातत्याने व्यस्त असलेल्या डॉक्टरला क्षुल्लक कारणावरून झालेली मारहाण ग्रामस्थांना सहन झाली नाही. त्यांनी याचा जाब विचारण्यासाठी परिचारिकेच्या घराकडे मोर्चा वळविला. मात्र मोठा जमाव घराकडे येत असल्याचे पाहून परिचारिका व तिच्या नातेवाईकांनी स्वत:ला घरात बंद करून घेतले. शेवटी गावातील ज्येष्ठांनीच समजूत काढून हे प्रकरण निपटविले. मात्र या घटनेबाबत तक्रार द्यावी असा आग्रह वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन उके यांनी महागाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी परिचारिकेसह चार आरोपींविरोधात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.
या घटनेची रुग्णालय अधीक्षक डॉ. हरीभाऊ फुफाटे यांनी गंभीर दखल घेत त्याबाबतचा अहवाल जिल्हा शल्यचिकित्साकडे पाठविला आहे. त्यामध्ये सदर परिचारिकेची तातडीने बदली केली जावी व वर्तनुकीबाबत शासकीय सेवा अधिनियमानुसार कारवाई व्हावी अशी शिफारस केली आहे. (शहर प्रतिनिधी)