The number of frauds in Bhisi is estimated at 50 crores | भीसीतील फसवणुकीचा आकडा ५० कोटींवर
भीसीतील फसवणुकीचा आकडा ५० कोटींवर

ठळक मुद्देपोलीस महानिरीक्षकांवर नजरा : ऑर्गनायझर, सबआॅर्गनायझरच्या नावांची पोलिसांकडून जुळवाजुळव सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरात भीसीतून झालेल्या फसवणुकीचा आकडा ५० कोटींपेक्षा अधिक असून तो ७० कोटींपर्यंत असण्याची शक्यता व्यापाऱ्यांच्या वर्तुळातून वर्तविली जात आहे. दरम्यान ‘लोकमत’मधील भीसीच्या वृत्तमालिकेवर अमरावतीच्या विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाने लक्ष केंद्रीत केले असून या कार्यालयाची यंत्रणा भीसीतील आॅर्गनायझर, सबऑर्गनायझर तसेच फसविले गेलेल्या व्यापारी, व्यावसायिकांच्या नावाची जुळवाजुळव करीत असल्याची माहिती आहे.
यवतमाळ शहरात भीसी व्यवसायातील खूप मोठा ‘झोल’ उघडकीस आला आहे. ‘लोकमत’ने त्यावर प्रकाशझोत टाकला. स्थानिक पोलीस प्रशासनाने भीसीच्या या व्यवहारात अद्याप तक्रार नाही अशी सबब पुढे करून ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’ची भूमिका घेतली आहे. परंतु ‘लोकमत’ची भीसीवरील वृत्तमालिका अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे व त्यांच्या अधिनस्त यंत्रणेच्या नजरेतून सुटलेली नाही. महानिरीक्षक कार्यालयाने भीसीतील या फसवणुकीच्या प्रकारावर संपूर्ण लक्ष केंद्रीत केले आहे. या प्रकरणात विविध मुद्यांवर प्राथमिक माहिती गोळा केली जात आहे. त्यानंतर चौकशीची दिशा निश्चित केली जाणार असल्याचे सांगितले जाते.
भीसीत फसवणूक करणारे व फसविले गेलेले अशा सर्वांची यादी बनविली जात आहे. कुणाची तक्रार प्राप्त झाली नसली तरी भीसी व्यवसायातून चालणारी अवैध सावकारी, त्यातील गुंडांचा शिरकाव यामुळे पोलीस स्वत:हून या प्रकरणात अनेकांना रेकॉर्डवर आणण्याच्या तयारीत आहे. एकदा रेकॉर्डवर आणून नंतर भीसी व्यवसायाची पाळेमुळे खणण्याची व त्यातून अवैध सावकारांवर जरब निर्माण करण्याची पोलीस महानिरीक्षक कार्यालयाची व्युहरचना असल्याची माहिती आहे.

कारवाईचा फोकस जाजू चौक, सरदार चौक, मेनलाईनवर
भीसीच्या या व्यवसायात ऑर्गनायझर कोण?, त्यांचे सबऑर्गनायझर कोण?, कुणाची किती आर्थिक क्षमता, त्यांची कार्यालये कुठे, त्यांचे नेमके सदस्य (विविध क्षेत्रातील व्यापारी, व्यावसायिक) कोण?, प्रत्येकाचे कुणाकडे किती खाते, भीसीतील पैसा नेमका कोणत्या अवैध सावकाराकडे जातो, कुणी किती रक्कम बुडविली, ही रक्कम आयपीएल क्रिकेट सट्ट्यात हारली का की, इतरत्र गुंतवणूक करून भीसीच्या सदस्यांपुढे नादारी घोषित केली, कुण्या ऑर्गनायझरला गुन्हेगारी वर्तुळातील नेमके कुणाचे पाठबळ, हे ऑर्गनायझर शहरातील गुंडांच्या नेमक्या कोणत्या टोळीशी कनेक्ट आहेत, आदी मुद्यांवर माहिती मिळविण्यासाठी महानिरीक्षक कार्यालयाचा फोकस राहणार आहे. प्रकरणाची व्याप्ती पाहता चौकशीची सूत्रेच महानिरीक्षक कार्यालयाकडे राहण्याची दाट शक्यता आहे.


Web Title: The number of frauds in Bhisi is estimated at 50 crores
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.