आता अनिलच्या डोळ्यात आॅलिम्पिक पदकाचे वेध

By Admin | Updated: August 29, 2015 02:42 IST2015-08-29T02:42:13+5:302015-08-29T02:42:13+5:30

पुसद तालुक्यातील नाणंद हे डोंगराच्या कुशीत वसलेले १५०० लोकवस्तीचे लहानसे गाव.

Now watch an Olympic medal in Anil's eye | आता अनिलच्या डोळ्यात आॅलिम्पिक पदकाचे वेध

आता अनिलच्या डोळ्यात आॅलिम्पिक पदकाचे वेध

यवतमाळचे वैभव : जागतिक व एशियन कुस्ती स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व, प्रतिकल परिस्थितीत मिळविले घवघवीत यश
नीलेश भगत  यवतमाळ
पुसद तालुक्यातील नाणंद हे डोंगराच्या कुशीत वसलेले १५०० लोकवस्तीचे लहानसे गाव. दिवाळीच्या सणानिमित्त आयोजित कुस्त्यांच्या दंगलीत १० वर्षाचा किरकोळ पण काटक शरीरयष्टीचा आदिवासी मुलगा हौदात लंगोट बांधून कुस्तीसाठी तयार होता. कुस्ती सुरू झाली त्याने क्षणात विजेच्या चपळाईने प्रतिस्पर्ध्याला अस्मान दाखवून कुस्ती जिंकली. त्याला नारळ व दहा रुपयाचे रोख बक्षीस मिळाले. दंगलीतील या एका कुस्तीने त्याच्या आयुष्याला दिशा मिळाली. कुस्तीला आपल्यापासून कधीही लांब करायचे नाही, असे त्याने ठरविले, अथक मेहनत घेतली. एक-एक स्पर्धा जिंकत चक्क आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचला. सातासमुद्रापार तिथे एक दोन नव्हे तर चार आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले.
गावातील दंगलीच्या कुस्तीपासून थेट जागतिक कुस्तीपर्यंत उत्तुंग भरारी घेणाऱ्या युवकाचे नाव आहे अनिल काळूराम तोरकड़ १६ जून १९९७ ही त्याची जन्मतारिख. नाणंद या छोट्याशा गावात तीन एकर शेतीवर तोरकड कुटुंबाचा कसाबसा उदरनिर्वाह चालतो. अनिल पाचव्या वर्गात असताना वडिलांचा मृत्यू झाला. दोन मुलं व एक मुलगी अशा परिवाराचा आईच आता संसाराचा गाडा चालविते. गावात भौतिक सोयीसुविधा व दळणवळणाच्या कोणत्याच सुविधा नाही. शाळा केवळ १ ते ५ पर्यंत, अशा विपरित परिस्थितीत राहणाऱ्या गावाला मात्र कुस्त्यांचे भारी वेड. दरवर्षी दिवाळीला कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन होते. अनिलचे आजोबा चांगली कुस्ती खेळायचे. आजोबांनीच त्याला कुस्तीच्या हौदाकडे नेले. दोन-चार कुस्त्या जिंकल्यावर अनिललाही कुस्ती आवडू लागली.
पाचवीनंतर गावात शिक्षणाची सोय नसल्याने गावातील अनेक मुले रामकृष्ण क्रीडा आश्रमशाळा अमरावती येथे राहून पुढील शिक्षण घेत होती. अनिलला या आश्रमशाळेत प्रवेश मिळाला. येथेही त्याने कुस्तीचा सराव सुरूच ठेवला. दरम्यान हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रा. संजय तिरथकर यांनी अनिलला कुस्ती खेळताना पहिले त्यांनी अनिलचे कुस्तीतील गुण हेरले व त्याला तंत्रशुद्ध प्रशिक्षण द्यायला सुरूवात केली. दोन-तीन वर्षात तो बऱ्यापैकी तयार झाला. ९ वीला असताना अनिलने पहिली जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा जिंकली. याच वर्षी तो राज्यस्तरावर पोहोचला. राज्यस्पर्धेत मात्र पहिल्याच सामन्यात पराभव झाला. अनिल हताश झाला. प्रा. तिरथकरांनी त्याला धीर दिला. त्याची लढाई भारतातील खेळाडुंसोबत नाही तर त्याला जगाशी लढायचे आहे, हा आत्मविश्वास त्यांनी दिला.
एखाद्या खेळाडुच्या आयुष्यात गुरूचे किती महत्व आहे याची जाणीव अनिलला झाली. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करून देशाचे नाव उंचवायचे हे ध्येय बाळगून अनिलने पुढे अथक मेहनत घेतली. पुढच्याच वर्षी अनिलने राज्य कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक आणले. राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली. कन्याकुमारी येथे झालेल्या स्पर्धेत ४२ किग्रॅ वजनाच्या गटात सुवर्ण पदक जिंकून त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. उत्कृष्ट कामगिरीच्या आधारावर जुलै २०१३ मध्ये अनिलची मंगोलिया येथील एशियन कॅडेट कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली. त्याची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा.
येथेही त्याने चांगले प्रदर्शन केले. त्याचवर्षी युरोपमध्ये सर्बिया देशात जागतिक कुस्ती स्पर्धा झाली. या स्पर्धेतही अनिलची भारतीय संघात निवड झाली. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्याची कामगिरी उंचावत गेली. २०१४ मध्ये थायलंड येथे एशियन कुस्ती स्पर्धेत त्याला अकरावे स्थान मिळाले. त्याच वर्षी स्लोवाकिया देशात झालेल्या जागतिक स्पर्धेत वैयक्तिक सर्वोच्च कामगिरी करीत सातवा क्रमांक पटकाविला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्वत:च्या कामगिरीवर तो समाधानी नाही आता त्याला वेध लागले ते आॅलिम्पिक स्पर्धेचे देशासाठी पदक जिंकण्याचे.
यासाठी तो दररोज सहा तास अथक मेहनत करीत आहे. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ त्याचे हे ध्येय गाठण्यासाठी त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. सध्या पुणे येथील काका पवारांच्या तालिम केंद्रात अनेक कुस्तीतील अद्ययावत डावपेच शिकत आहे. भविष्यात आॅलिम्पिकचे ध्येय गाठत असताना अनिलला नवनवीन विक्रमाला गवसणी घालायची आहे.

Web Title: Now watch an Olympic medal in Anil's eye

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.