आता डोंगर पोखरणारे जिल्हाधिकाऱ्यांचे टार्गेट
By Admin | Updated: June 13, 2015 02:28 IST2015-06-13T02:28:51+5:302015-06-13T02:28:51+5:30
रेती माफियांपाठोपाठ जिल्हाधिकाऱ्यांनी आता यवतमाळ शहरासह जिल्हाभरातील गिट्टी खदान व क्रशर व्यावसायिकांवर लक्ष केंद्रीत केले आहे.

आता डोंगर पोखरणारे जिल्हाधिकाऱ्यांचे टार्गेट
गिट्टी खदान-क्रशर : लांबी-रुंदी-उंची मोजण्याचे आदेश
यवतमाळ : रेती माफियांपाठोपाठ जिल्हाधिकाऱ्यांनी आता यवतमाळ शहरासह जिल्हाभरातील गिट्टी खदान व क्रशर व्यावसायिकांवर लक्ष केंद्रीत केले आहे. डोंगर पोखरणाऱ्यांना आता धडा शिकविला जाणार आहे.
नदी-नाले, डोंगर-दऱ्या, वृक्ष ही नैसर्गिक साधन संपत्ती आहे. मात्र या साधन संपत्तीचीही रॉयल्टीच्या नावाखाली लूटपाट सुरू आहे. रेती माफियांविरुद्ध धडक मोहीम उघडणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांनी आता मुरुम, मोठे दगड काढणाऱ्या गौण खनिज कंत्राटदारांविरुद्धही मोर्चेबांधणी चालविली आहे. यवतमाळ शहरात चहूबाजूने डोंगर पोखरले गेले आहे. त्यातून मोठमोठ्ठे दगड काढून क्रशरद्वारे त्याची गिट्टी बनविले जाते. ही गिट्टी अव्वाच्या सव्वा दराने ग्राहकांना विकली जाते. गौण खनिज कंत्राटदारांनी मोठमोठ्ठे डोंगर अक्षरश: पोखरले आहे. दारव्हा रोड, गोदनी रोड या भागात त्याचे सबळ पुरावे उपलब्ध आहे. आतापर्यंत गावातील पुढारी व लोकल प्रशासनाला हाताशी धरुन हा कारभार सुरू होता. मात्र आता थेट जिल्हाधिकाऱ्यांनीच त्यात लक्ष घातल्याने या लोकल प्रशासनाची कोंडी झाली आहे.
डोंगर फोडून मोठ्ठाले दगड काढणाऱ्या कंत्राटदारांची चौकशी होणार आहे. त्यांनी कोणकोणत्या खदानी घेतल्या, त्यातून किती दगड काढला, त्यापोटी किती रॉयल्टी भरली, त्यांच्यामार्फत विक्री होणाऱ्या गिट्टी-बोल्डरचा दर काय या सर्व बाबींची चौकशी होणार आहे. खदानींची लांबी-रुंदी-उंची मोजली जाणार आहे. त्यात दोषी आढळलेल्या कंत्राटदारासह या खदानींवर देखरेख ठेवणाऱ्या लोकल शासकीय कर्मचाऱ्यांवर फौजदारी केली जाणार आहे. त्यामुळे गिट्टी खदान-क्रशर मालकांचे धाबे दणाणले आहे.
रेती माफियांवर दहा दिवसात शंभरावर गुन्हे नोंदविले गेले. अगदी तशाच पद्धतीने आता गिट्टी खदान-क्रशर मालकांवर गुन्हे नोंदविले जाण्याची शक्यता आहे. (जिल्हा प्रतिनिधी)