आता खर्या अर्थाने प्रकल्पांना गती मिळेल
By Admin | Updated: May 17, 2014 02:10 IST2014-05-17T00:31:53+5:302014-05-17T02:10:21+5:30
मी यापूर्वी तीनवेळा खासदार होते. मतदारसंघाचा विकास व्हावा हाच ध्यास माझ्या मनात असायचा. परंतु विरोधी पक्षाची खासदार असल्याने केंद्र सरकार आपण प्रस्तावित केलेल्या कामांकडे दुर्लक्ष करायचे.

आता खर्या अर्थाने प्रकल्पांना गती मिळेल
गजानन अक्कलवार - यवतमाळ
मी यापूर्वी तीनवेळा खासदार होते. मतदारसंघाचा विकास व्हावा हाच ध्यास माझ्या मनात असायचा. परंतु विरोधी पक्षाची खासदार असल्याने केंद्र सरकार आपण प्रस्तावित केलेल्या कामांकडे दुर्लक्ष करायचे. त्यामुळे विकासाच्या योजना खेचून आणताना कमालीच्या र्मयादा यायच्या. आता जिल्ह्याच्या विकासपूर्तीचा क्षण जवळ आला आहे. केंद्रात आमचे (एनडीएचे) सरकार स्थापन होणार असल्याने खर्या अर्थाने केंद्राचे प्रकल्प यवतमाळ-वाशिम मतदार संघात राबवू, अशी ग्वाही शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी दिली. विजयानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया नोंदविली.
यवतमाळचा रेल्वे प्रकल्प बर्याच वर्षांपासून प्रलंबित आहे. जनतेचाही हा ‘ड्रिम प्रोजेक्ट’ आहे. आता हा प्रकल्प पूर्ण होण्याच्या मार्गातील काँग्रेसचा अडथळा दूर झाला आहे. येत्या पाच वर्षाच्या कार्यकाळात हा प्रकल्प पूर्ण केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असा विश्वासही गवळी यांनी व्यक्त केला.
नरेंद्र मोदी यांच्यावर जनतेने दाखविलेला विश्वास, काँग्रेस विरोधी लाट, सर्वत्र बोकाळलेला भ्रष्टाचार आणि भगवा फडकविण्याच्या बाळासाहेबांच्या स्वप्नांचा हा विजय असल्याचे त्यांनी मान्य केले. माझ्या विजयाचे श्रेय कोणा एकाला देता येणार नसून ही सामूहिक प्रयत्नाची फलश्रृती असल्याचे भावना गवळी यांनी सांगीतले.
जिल्ह्यात बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक तरुण कामाच्या शोधात स्थलांतरित होत आहे. जिल्ह्यातील राजकीय पुढार्यांनी बेरोजगारांच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे. युवकांना रोजगार उपलब्ध व्हावे, यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातील. टेक्सटाईल पार्क तयार करणे हे आपले स्वप्न आहे. त्यादृष्टीने काही वर्षांंपासून प्रयत्न सुरू आहे. परंतु केंद्रातील सरकारने विरोधी पक्षाची खासदार म्हणून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.
आता नरेंद्र मोदी यांच्या शासन काळात हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कुठलीही कसर सोडणार नाही, असे त्यांनी सांगितले. आता मला माझ्यातील क्षमतांचा जनतेच्या विकासासाठी योग्य वापर करता येणार आहे. पुढील पाच वर्षे मतदारसंघासाठी सुवर्णकाळ ठरेल, असे त्या म्हणाल्या.