आता सैन्यभरतीची प्रक्रिया होणार आॅनलाईन
By Admin | Updated: August 21, 2015 02:54 IST2015-08-21T02:54:34+5:302015-08-21T02:54:34+5:30
आजवर खुल्या पद्धतीने होणारी सैन्य भरतीची प्रक्रिया यापुढे आॅनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे भरतीसाठी ग्रामीण भागातून येणाऱ्या हजारो तरुणांचा...

आता सैन्यभरतीची प्रक्रिया होणार आॅनलाईन
यवतमाळ : आजवर खुल्या पद्धतीने होणारी सैन्य भरतीची प्रक्रिया यापुढे आॅनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे भरतीसाठी ग्रामीण भागातून येणाऱ्या हजारो तरुणांचा वेळ आणि पैसाही कमी प्रमाणात खर्च होईल, अशी माहिती नागपूरचे आर्मी रिक्य्रूटमेंट आॅफिसर कर्नल एम. के. जोशी यांनी गुरुवारी दिली.
माहिती अधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार ते बोलत होते. नव्या भरती प्रक्रियेची माहिती देताना कर्नल जोशी म्हणाले, पूर्वी ठरावीक ठिकाणी आयोजित भरतीसाठी उमेदवारांना कोणताही अर्ज न करता थेट येण्याची मुभा होती. परंतु, अनेक कसोट्यांमध्ये उत्तीर्ण होताना या तरुणांना काही दिवस मुक्कामी राहावे लागायचे. त्यात वेळ व पैसा अधिक लागायचा. आता आॅनलाईन सैन्य भरतीसाठी ‘जॉईन इंडियन आर्मी डॉड नीक डॉट इन’ ही वेबसाईट बनविण्यात आली आहे. त्यावरच उमेदवारांना आॅनलाईन नोंदणी करून अर्ज करावा लागणार आहे. भरती प्रक्रिया सुरू होण्याच्या ४५ दिवसांपूर्वी या संकेतस्थळावर नोंदणी सुरू करण्यात येणार आहे. भरती जाहीर झाल्यानंतर तरुणांना लॉग-इन करण्याची सुविधा साईटवर सुरू करण्यात येईल. आॅनलाईन नोंदणी करताना उमेदवारांकडे आवश्यक ती पात्रतेची कागदपत्रे तयार असणे आवश्यक आहे. पूर्वी खुल्या भरतीप्रक्रियेदरम्यान एखाद्या कसोटीत अनुत्तीर्ण होणाऱ्या उमेदवाराचा जाण्या-येण्याचा, निवास-भोजनाचा खर्च व्यर्थ जात होता.
आता आॅनलाईन प्रक्रियेदरम्यान, एखाद्या कसोटीत बसत नसल्यास त्याला आॅनलाईनच ‘रिजेक्ट’ करण्यात येईल. त्यामुळे निदान त्याचा खर्च तरी वाचणार आहे. तर निकषात बसणाऱ्या तरुणांना याच संकेतस्थळावर पुढील परीक्षा व शारीरिक चाचण्यांसाठी ‘अॅडमिट कार्ड’ देण्यात येणार आहे, असे कर्नल जोशी यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला सैनिक कल्याण अधिकारी फ्लाईट लेफ्टनंट धनंजय सदाफळ, सहायक सैनिक कल्याण अधिकारी सुभेदार वसंत मत्ते उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)