आता वीज बिल भरा मोबाईलवरून !
By Admin | Updated: February 20, 2016 00:20 IST2016-02-20T00:20:48+5:302016-02-20T00:20:48+5:30
वीज ग्राहकांच्या सोयीसाठी महावितरणच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने खास मोबाईल अॅप तयार केले असून....

आता वीज बिल भरा मोबाईलवरून !
यवतमाळ : वीज ग्राहकांच्या सोयीसाठी महावितरणच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने खास मोबाईल अॅप तयार केले असून ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे अॅप सर्व ग्राहकांसाठी खुले केल्याची माहिती महावितरणच्या अकोला परिमंडळाने दिली.
या मोबाईल अॅपमुळे वीज ग्राहक आपले वीज बिल कोठेही पाहू शकतो, भरू शकतो. वीज सेवा व त्यासंबंधीच्या विविध तक्रारीही याच मोबाईल अॅपवरून नोंदविता येतात. त्यामुळे बिल भरण्यासाठी तासन्तास रांगेत थांबण्याची गरज नाही. सुरुवातीच्या टप्प्यात अॅन्ड्रॉईट व ब्लॅक बेरी आॅपरेटिंग सिस्टीमच्या मोबाईलधारकांसाठी हे अॅप असणार आहे. लॅपटॉप व संगणकावरदेखील ते डाऊनलोड करता येते. महाडिस्कॉम डॉट इन या संकेतस्थळावर याबाबत अधिक सूचना देण्यात आल्या आहे. गुगल प्ले स्टोअरवर महावितरण नावाने शोधल्यास महावितरणच्या लोगोचे अॅप मोबाईलवर इन्स्टॉल करता येते. अॅप डाऊनलोड झाल्यावर जे ग्राहक वेब सेल्फ सर्व्हिसेस पोर्टलचा वापर करीत होते, त्यांना अॅपवर वेगळा आयडी तयार करण्याची गरज नसून ते थेट लॉगिंग करू शकतात. इतर ग्राहकांना नवीन खाते उघडता येते. त्यात कंझ्युमर नंबर, बिलिंग युनिट, जन्मतारीख, स्वत:चा मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, पोस्टल पिनकोड, युझर नेम, पासवर्ड आदी माहिती भरावी लागेल. अॅपमधील व्ह्यू अॅन्ड पे बिल्स् या आॅप्शनवर क्लिक केल्यास चालू महिन्याचे बिल, बिल भरण्याची तारीख इत्यादी नोंदी दिसतील. तक्रार नोंदविण्यासाठी रजिस्टर कंपलेंट हा पर्याय देण्यात आला आहे. तसेच कस्टमर केअर हे आॅप्शनही ग्राहकांसाठी उपयुक्त ठरणारे आहे. या अॅपमुळे तक्रारींचा निपटारा वेळेत होण्यास मदत होईल, अशी माहिती अकोला परिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी विकास आढे यांनी दिली.
(स्थानिक प्रतिनिधी)