महा ई-सेवा केंद्रात आता दरफलक
By Admin | Updated: July 26, 2016 00:02 IST2016-07-26T00:02:10+5:302016-07-26T00:02:10+5:30
महा ई सेवाकेंद्राकडून विविध प्रमाणपत्र नागरिकांना उपलब्ध करून देतात. यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या दरांपेक्षा अधिक पैसे घेतले जातात,

महा ई-सेवा केंद्रात आता दरफलक
यवतमाळ : महा ई सेवाकेंद्राकडून विविध प्रमाणपत्र नागरिकांना उपलब्ध करून देतात. यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या दरांपेक्षा अधिक पैसे घेतले जातात, अशा प्रकारच्या तक्रारी महसूल विभागाला प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची तातडीने दखल घेत आता महा ई सेवा केंद्राच्या दर्शनी भागात कोणत्या प्रमाणपत्रासाठी किती पैसे लागतील, याचे दरपत्रक लावण्यात येणार आहे.
महसूल विभागाकडून दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्रांसाठी जे दर आकारण्यात येणार आहेत, तेसुद्धा जाहीर करण्यात आले आहे. जातीचे प्रमाणपत्र प्रतिज्ञापत्रासह आणि नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र प्रतिज्ञापत्रासह प्रत्येकी ५६ रुपये दर आकारण्यात येईल.
याशिवाय इतर प्रमाणपत्रांसाठी ३३ रुपये दर आकारण्यात येणार आहे. यामध्ये वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र (प्रतिज्ञापत्रा विना), उन्पन्न प्रमाणपत्र, तात्पुरते रहिवासी प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, ऐपतीचा दाखला, सांस्कृतिक कार्यक्रम परवाना, अधिकार अभिलेखाची प्रमाणित प्रत, अल्पभूधारक दाखला, भूमीहिन शेतमजूर असल्याचा दाखला, शेतकरी असल्याचा दाखला, डोंगर/दुर्गम क्षेत्रात राहत असल्याचे प्रमाणपत्र व प्रतिज्ञापत्र साक्षांकीत करणे आदी प्रमाणपत्रांचा समावेश आहे. अशाप्रकारचे दरपत्रक महा ई सेवाकेंद्रासमोर ग्राहकांच्या सोयीसाठी लावणे आवश्यक आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होणार नाही. (प्रतिनिधी)