आता होईल गावागावांत आधार नोंदणी

By Admin | Updated: May 9, 2016 02:24 IST2016-05-09T02:24:20+5:302016-05-09T02:24:20+5:30

गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यातील सोळाही तालुक्यातील तहसील कार्यालयांमध्ये आधार कार्ड नोंदणी सुरू करण्यात आली आहे.

Now it will be the basis for the registration of the village | आता होईल गावागावांत आधार नोंदणी

आता होईल गावागावांत आधार नोंदणी

वंचितांना दिलासा : तहसील कार्यालयातही केंद्र सुरूच
सुहास सुपासे यवतमाळ
गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यातील सोळाही तालुक्यातील तहसील कार्यालयांमध्ये आधार कार्ड नोंदणी सुरू करण्यात आली आहे. आता त्यासोबतच ग्रामीण भागात गावागावात आधार नोंदणी करण्यात येणार आहे. अद्यापही जे नागरिक आधार कार्डपासून वंचित आहेत, अशा नागरिकांसाठी ही मोहीम महसूल प्रशासनाकडून राबविण्यात ये आहे.
प्रत्येक गावात आधार कार्ड मोहीम राबविली जाणार असल्यामुळे अद्यापही जे नागरिक काही कारणास्तव तालुक्याच्या ठिकाणी जाऊ शकले नाहीत, अशांसह आजारी, अपंग, वृद्ध असे सर्व नागरिक आपल्या गावातच आधार नोंदणी करू शकतील.
साधारणत: एक वर्षापूर्वी जिल्ह्यात ३५ ते ४० टक्के नागरिक आधार कार्डापासून वंचित होते. याचे मुख्य कारण म्हणजे आधार कार्ड केंद्रच उपलब्ध नव्हते. त्यामुळे नागरिकांना आधार केंद्रासाठी भटकंती करावी लागत होती. परंतु गेल्या सहा महिन्यात जिल्हा प्रशासनाने यामध्ये उल्लेखनीय प्रगती केली आहे. सुरूवातीला जिल्ह्यातील अधिकाधिक शाळा-अंगणवाड्या यामध्ये कव्हर केल्या. एकही विद्यार्थी आधार मोहिमेतून सुटणार नाही, याची दक्षता घेण्यात आली. त्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांमध्ये आधार कार्ड केंद्र सुरू केले. याचाच परिणाम म्हणून सध्या ८० टक्क्याहून अधिक नागरिक आधारच्या कक्षेत आले आहेत.
परंतु अद्यापही १५ ते २० टक्के नागरिक आधारकार्ड शिवाय आहेत. यामध्ये बहुतांश नागरिक ग्रामीण भागातील आहेत. ही बाब हेरून जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित केले आहे. गावागावात जाऊन आधार कार्ड काढणे सध्या सुरू आहे. छोट्या गावांमध्ये एक दिवस तर मोठ्या गावांमध्ये लोकसंख्येचा अंदाज घेऊन दोन किंवा तीन दिवसही रोटेशननुसार हे केंद्र सुरू करण्यात आले आहेत. ही जबाबदारी मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांकडे सोपविण्यात आली आहे. मध्यंतरी तलाठ्यांच्या संपामुळे या कामाला खिळ बसली होती. परंतु आता पुन्हा गती आली आहे.
यवतमाळ तालुक्यात २० मशिन्स दोन मंडळ अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आल्या आहेत. म्हणजे एका दिवसात साधारणत: २० गावे होणार आहेत. मोठ्या गावांमध्ये रोटेशननुसार पुन:पुन्हा ही मोहीम राबविण्यात येईल. सबंधित नागरिकांनी आपल्या गावातील तलाठ्याशी संपर्क साधल्यास त्यांना त्यांच्या गावातील आधार कार्ड शिबिराचा दिवस कळू शकेल. तसेच संबंधित तहसीलमधूनही याबाबत माहिती मिळू शकेल. सर्व नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि आधार कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन तहसीलदार सचिन शेजाळ यांनी केले आहे.

Web Title: Now it will be the basis for the registration of the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.