काँग्रेसची आता जिल्हाभर रथयात्रा

By Admin | Updated: December 23, 2016 02:04 IST2016-12-23T02:04:05+5:302016-12-23T02:04:05+5:30

सतत पाच निवडणुकांमधील पराभवामुळे मोडकळीस आलेल्या काँग्रेसला पुनरुज्जीवीत करण्यासाठी

Now the Congress rath yatra in the district | काँग्रेसची आता जिल्हाभर रथयात्रा

काँग्रेसची आता जिल्हाभर रथयात्रा

बैठक : निवडणुकीसाठी वातावरण निर्मिती
यवतमाळ : सतत पाच निवडणुकांमधील पराभवामुळे मोडकळीस आलेल्या काँग्रेसला पुनरुज्जीवीत करण्यासाठी आता जिल्हाभर रथयात्रा काढण्याचा निर्णय नेत्यांच्या बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या रथयात्रेच्या माध्यमातून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्नही काँग्रेस करणार आहे.
जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांची बैठक बुधवारी शासकीय विश्रामभवनात पार पडली. उशिरापर्यंत चाललेल्या या बैठकीत अनेक मुद्यांवर चर्चा झाली. लोकसभा, विधानसभा, नगरपंचायत, विधान परिषद, नगरपरिषदा अशा पाठोपाठ निवडणुकांमध्ये काँग्रेसला दारूण पराभवाचा सामना करावा लागल्याने कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. या कार्यकर्त्यांची मोट बांधण्याची गरज आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग्रेसला पोषक वातावरण निर्माण करता यावे या दृष्टीने काँग्रेसने वणीपासून उमरखेडपर्यंत सर्व १६ ही तालुक्यात रथयात्रा काढण्याचे ठरविले आहे. आचारसंहिता लागण्याची शक्यता पाहता वेळ कमी असल्याने या रथयात्रेबाबत तातडीने अंमलबजावणी केली जाणार आहे. त्याच्या नियोजनासाठी नेते-पदाधिकाऱ्यांची पुन्हा लगेच बैठक घेतली जाणार आहे. या रथयात्रेच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा विजयाचा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न होणार आहे.
जनतेतील नाराजी कॅश करण्याच्या दृष्टीने आणि काँग्रेस पक्षाबाबत जनतेत पुन्हा विश्वास निर्माण करण्याच्या दृष्टीने रथयात्रा उपयोगी ठरेल, असा विश्वास बैठकीत व्यक्त केला गेला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने वातावरण निर्मिती करून मतदारांना वास्तव पटवून देण्याचा व त्या माध्यमातून काँग्रेसचे संख्याबळ वाढविण्याचा प्रयत्न नेते-पदाधिकाऱ्यांकडून होणार आहे. या बैठकीमध्ये लहान पक्षांसोबत आघाडी करण्याच्या दृष्टीनेही प्राथमिक चर्चा झाली. मात्र या संबंधिचे अधिकार पक्षश्रेष्ठी स्थानिक पातळीवर देतात की नाही याबाबतची साशंकता पदाधिकाऱ्यांमध्ये पहायला मिळाली. (जिल्हा प्रतिनिधी)

जिल्हा काँग्रेसला सेनापतीच मिळेना !
शतकोत्तरी परंपरा असलेल्या काँग्रेस पक्षाला यवतमाळ जिल्ह्यात नवा जिल्हाध्यक्ष मिळेनासा झाला आहे. म्हणायला अनेक नावे पुढे येत असली तरी त्यावर नेत्यांमध्ये कुणाबाबतही एकमत होताना दिसत नाही. काँग्रेस कमिटीने पॅनलवर दोन नावे पाठविली असली तरी त्याबाबतही काहींची नाराजी आहे. सेनापतीच नसताना काँग्रेसच्या जिल्हाभरातील सैनिकांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका लढवायच्या कशा हा प्रश्न आहे.

 

Web Title: Now the Congress rath yatra in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.