पीककर्जासाठी आता हल्लाबोल आंदोलन
By Admin | Updated: August 3, 2014 23:38 IST2014-08-03T23:38:49+5:302014-08-03T23:38:49+5:30
मागील वर्षी झालेली अतिवृष्टी आणि गारपीट यामुळे खचलेल्या शेतकऱ्यांना यंदा लांबलेल्या पावसामुळे दुबार व तिबार पेरणीचा सामना करावा लागला. त्यातच पेरणीनंतर अनेक ठिकाणी बियाणेसुद्धा उगवले नाही.

पीककर्जासाठी आता हल्लाबोल आंदोलन
यवतमाळ : मागील वर्षी झालेली अतिवृष्टी आणि गारपीट यामुळे खचलेल्या शेतकऱ्यांना यंदा लांबलेल्या पावसामुळे दुबार व तिबार पेरणीचा सामना करावा लागला. त्यातच पेरणीनंतर अनेक ठिकाणी बियाणेसुद्धा उगवले नाही. यातून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट करण्यात आली आहे. वरुण राजाच्या कृपेने कसा तरी शेतकरी दुबार-तिबार पेरणी करून सावरण्याचा प्रयत्न करीत आहे. खावटी पीककर्ज व दुबार पेरणीच्या मदतीसाठी विदर्भ जनआंदोलन समितीच्यावतीने १५ आॅगस्टला हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती विदर्भ आंदोलन समितीचे संयोजक किशोर तिवारी यांना एका प्रसिद्धीपत्रकातून दिली.
यापूर्वी हे आंदोलन १ आॅगस्ट रोजी घोषित करण्यात आले होते. या आंदोलनाचा एक भाग म्हणून विदर्भ जनआंदोलन समितीच्यावतीने संपूर्ण जिल्ह्यात जनजागरण करण्यात येत आहे. यंदा बँकांनी नकारात्मक भूमिका स्वीकारल्यामुळे ९० टक्के शेतकरी पीककर्जापासून वंचित राहिले आहे. शेतकऱ्यांची स्थिती पाहून गावात सावकारसुद्धा त्याला कर्ज द्यायला तयार नाही. समाधानकारक पीक येण्याची शक्यता नसल्यामुळे कृषी केंद्र संचालकसुद्धा उधारीवर माल द्यायला तयार नाही. गावातील किराणा दुकानदारही उधारीत साहित्य देत नाही.
एकीकडे शेतकऱ्यांची अशी अवस्था असताना मजुरीचासुद्धा भीषण प्रश्न निर्माण झाल्यामुळे शेतमजुरांना उपासमारीला तोंड द्यावे लागत आहे. मागील वर्षी झालेल्या दुष्काळामुळे कोरडवाहू शेतकरी हवालदिल झालेला आहे. या सर्व हवालदिल झालेल्या कर्जबाजारी शेतकऱ्यांना सरकारी मदत, बियाणे व नवीन कर्ज मिळावे, यासाठी मागील दोन महिन्यांपासून आंदोलन सुरू असून शासन व प्रशासन मात्र कुंभकर्णी झोपेत असल्याचा आरोप किशोर तिवारी यांनी केला आहे.
सरकारी आकड्यानुसार दुबार पेरणी व कर्जामुळे आतापर्यंत यंदा ६८ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. असे असताना या आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत करण्याचे औचित्यही दाखविल्या जात नाही. गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळाचे सावट असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची कर्ज थकीत राहिले असून ९० टक्के शेतकऱ्यांना बँकांची दारे बंद झाली आहे. जिल्हा सहकारी बँका सक्तीची वसुली करीत आहे. कर्जाचे पुनर्वसन तर सोडाच या उलट पात्र शेतकऱ्यांना बँका पीककर्ज नाकारत आहे. कापूस व धान उत्पादक शेतकऱ्यांवर गेल्यावर्षी भाव पडल्यामुळे गंभीर आर्थिक संकट ओढवले होते. ७० ते ८० टक्के शेतकऱ्यांना कापूस व सोयाबीनच्या बोगस बियाण्यातून लुटण्यात आले आहे. यामुळे दिवसेंदिवस आत्महत्या वाढत आहे. सरकारने विदर्भातील कोरडवाहू शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, दुबार पेरणीची मदत, कापसाचा हमीभाव सहा हजार रुपये प्रतिक्विंटल करणे, सर्व गरिबांना अंत्योदय अन्नसुरक्षा, घरकूल, बीपीएल कार्ड मिळण्यात यावे, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती विदर्भ जनआंदोलन समितीचे सचिव मोहन जाधव यांनी एका प्रसिद्धी पत्रकातून दिलेली आहे.
(शहर प्रतिनिधी)