कुख्यात अक्षय राठोडवर ‘एमपीडीए’
By Admin | Updated: September 12, 2016 01:20 IST2016-09-12T01:20:19+5:302016-09-12T01:20:19+5:30
गुन्हेगारी जगतात सुपारी किलर म्हणून परिचित अक्षय राठोडवर शहर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी

कुख्यात अक्षय राठोडवर ‘एमपीडीए’
वाशिममध्ये स्थानबध्द : अनेक गंभीर गुन्हे
यवतमाळ : गुन्हेगारी जगतात सुपारी किलर म्हणून परिचित अक्षय राठोडवर शहर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार (एमपीडीए) कारवाई करण्यात आली असून त्याला जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी मंंंजुरी दिली आहे. अक्षयला वाशिम जिल्ह्यात स्थानबध्द केले जाणार आहे.
यवतमाळ शहरातील संघटित गुन्हेगारीत कुप्रसिध्द असलेला अक्षय आत्माराम राठोड (२४) याच्यावर सात गंभीर गुन्हे आहेत. यवतमाळ शहर टाणे आणि वर्धा येथे खुनाचा तर नेरमध्ये दरोड्याचा गुन्हा आहे. याशिवाय घातक शस्त्र बाळगणे, धमकावने यासारखे गुन्हे आहेत. सुपारी किलर अक्षयने मध्यंतरीच्या काळात शहरात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकांचे संघटन उभे केले होते. मात्र पोलिसांच्या सततच्या कारवाईमुळे त्याला मोठी कारवाई करता आली नाही. शेवटी त्याने आपले बस्तान नागपूर येथे हलविले. नेर येथे दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या अक्षयला स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. तेव्हापासून तो कारागृहातच आहे. चार पाच दिवसापूर्वी त्यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर पुन्हा प्रतिबंधक कारवाई करून त्याला अटक केली. सणासुदीच्या काळात अक्षय बाहेर राहणे धोक्याचे असल्याचे ओळखून शहर पोलिसांनी त्याच्या विरोधात एमपीडीएचा प्रस्ताव तयार केला. याला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिल्यानंतर अक्षयला रविवारी दुपारी जिल्हा कारागृहातून ताब्यात घेण्यात आले. त्याला आता वाशिम येथे स्थानबध्द केले जाणार आहे. शहर ठाण्याच्या इतिहासात १३ वर्षानंतर एखादा सक्रिय गुन्हेगारा विरोधात एमपीडीएचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. हा प्रस्ताव पोलीस अधिक्षक अखिलेशकुमार सिंग, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनात शहरचे ठाणेदार नंदकुमार पंत आणि सहायक निरीक्षक संग्राम ताटे यांनी तयार केला. (कार्यालय प्रतिनिधी)