ट्रॅक्टर मालकाला पाच लाखांच्या दंडाची नोटीस
By Admin | Updated: January 12, 2017 00:52 IST2017-01-12T00:52:33+5:302017-01-12T00:52:33+5:30
पुन्हा गौण खनिज वाहतूक करणार नाही, असे बंधपत्र दिले असताना पुन्हा गौण खनिज वाहतूक करून

ट्रॅक्टर मालकाला पाच लाखांच्या दंडाची नोटीस
बंधपत्र तोडले : महसूल राज्यमंत्र्यांकडे धाव
पुसद : पुन्हा गौण खनिज वाहतूक करणार नाही, असे बंधपत्र दिले असताना पुन्हा गौण खनिज वाहतूक करून या बंधपत्राचे उल्लंघन करणाऱ्या ट्रॅक्टर मालकाला पाच लाख रुपये दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे. अखेर या ट्रॅक्टर मालकाने बचावासाठी थेट महसूल राज्यमंत्र्यांच्या दरबारात धाव घेतल्याची माहिती आहे.
नारायण मनुलकर रा.शेंबाळपिंपरी ता.पुसद असे या ट्रॅक्टर मालकाचे नाव आहे. त्यांचा ट्रॅक्टर गौण खनिज वाहतूक करताना २१ आॅक्टोबर २०१६ रोजी पकडण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी जात मुचलका (बंधपत्र) पुसद तहसीलदारांपुढे सादर केला. या ट्रॅक्टरद्वारे पुन्हा वाहतूक झाल्यास पाच लाखांच्या दंडास मी पात्र राहील, असे त्यात नमूद होते. दरम्यान, हाच ट्रॅक्टर २७ डिसेंबर २०१६ रोजी हनवतखेडा येथील तलाठ्यांनी गौण खनिज वाहतूक करताना पुन्हा पकडला. अर्थात या ट्रॅक्टर मालकाने बंधपत्राचे उल्लंघन केले म्हणून तहसीलदारांनी ट्रॅक्टर मालकाला २ जानेवारी २०१७ रोजी नोटीस जारी केली असून पाच लाखांचा दंड १५ दिवसांच्या आत जमा करावा अन्यथा ट्रॅक्टरचा लिलाव करण्यात येईल, असे त्यात नमूद करण्यात आले. महसूल कायद्यात गौण खनिजाच्या किमतीच्या अधिकाधिक पाच पट दंड करण्याची तरतूद असताना पुसद तहसीलदारांनी तब्बल पाच लाखांचा दंड कोण्या आधारावर केला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अखेर या दंडात्मक कारवाईच्या विरोधात महसूल राज्यमंत्र्यांकडे न्याय मिळतो का, या उद्देशाने धाव घेण्यात आल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, पुसद तहसीलदारांनी महसूल कायद्यातील नव्या सुधारणांचा हवाला देत पाच लाखांच्या दंडाचे समर्थन केले असून ही कारवाई योग्यच असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले आहे.