लाखीच्या तंटामुक्त समिती अध्यक्षाला तडीपारीची नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:42 IST2021-08-15T04:42:18+5:302021-08-15T04:42:18+5:30
नंदलाल रावजी राठोड (६७) तडीपारीची नोटीस बजावण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी तक्रारीतून आपण मागील २५ वर्षांपासून लाखीचे पोलीस ...

लाखीच्या तंटामुक्त समिती अध्यक्षाला तडीपारीची नोटीस
नंदलाल रावजी राठोड (६७) तडीपारीची नोटीस बजावण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी तक्रारीतून आपण मागील २५ वर्षांपासून लाखीचे पोलीस पाटील असून सध्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष असल्याचे म्हटले आहे. तसेच २० ऑक्टोबर २०२० रोजी लहान बंधू सुभाष राठोड यांचे शेजारी शेतकरी विठ्ठल काठमोडे यांच्याशी धुऱ्याच्या कुंपणावरून वाद झाला होता. दोघांनीही परस्परविरोधी तक्रारी ग्रामीण पोलिसात दिल्या होत्या. त्या तक्रारीत आपले नाव जबरीने घुसविण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
काही तक्रारीतून विद्यमान न्यायालयाने आपली निर्दोष मुक्तता करूनही उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी जुन्या गुन्ह्यांचा आधार घेत १ ऑगस्टला आपल्याला तडीपारीची नोटीस बजावल्याचे त्यांनी तक्रारीत स्पष्ट केले. त्यांच्या मानसिक छळाला, दडपशाही व धमकीला कंटाळून आपण आत्महत्या करण्याच्या मन:स्थितीत आहोत, तरी आत्महत्या किंवा इच्छा मरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी नंदलाल राठोड यांनी पोलीस महासंचालकांकडे केली आहे.
बॉक्स
महानिरीक्षकांकडून आली यादी
आरोप खोटे असून कायदेशीर कारवाई सुरू आहे. नंदलाल राठोड यांच्यावर विविध प्रकारचे एकूण आठ गुन्हे दाखल आहे. पोलीस महानिरीक्षकांकडून तालुक्यातील २५ गुन्हेगारांची यादी आली. त्या सर्वांना तडीपार करण्याची नोटीस बजावण्यात आली. नंदलाल हे गुन्हेगार प्रवृत्तीचे असल्याने त्यांना पोलीस पाटील पदाववरून निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या पत्नीला अंगणवाडी सेविका पदावरून कमी केले आहे. ते पुढाऱ्यांमार्फत पोलीस कारवाईत अडथळा निर्माण करीत आहे. सरकारी यंत्रणेवर दबाव टाकत आहे, असे सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराग जैन यांनी सांगितले.