जनावर तस्करींची थेट ‘एसपीं’ना टीप

By Admin | Updated: March 5, 2017 00:50 IST2017-03-05T00:50:40+5:302017-03-05T00:50:40+5:30

जनावरे आंध्रप्रदेशात घेऊन जाणारे १४ ट्रक नागपुरातून निघाल्याची टीप थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांना मिळाली होती.

Note to live 'spin' of trafficking animals | जनावर तस्करींची थेट ‘एसपीं’ना टीप

जनावर तस्करींची थेट ‘एसपीं’ना टीप

सहा पोलीस ठाण्यांची नाकेबंदी : ११ ट्रक आदिलाबादकडे पळाले, तीन ट्रक ताब्यात
यवतमाळ : जनावरे आंध्रप्रदेशात घेऊन जाणारे १४ ट्रक नागपुरातून निघाल्याची टीप थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांना मिळाली होती. त्यावरून रात्री सहा पोलीस ठाण्यांच्या कर्मचाऱ्यांनी नाकेबंदी केली. मात्र ही नाकेबंदी झुगारुन बॅरेकेटस् व चेक पोस्ट उडवित ११ ट्रक आंध्रप्रदेशात निघून गेले. तीन ट्रक मात्र पोलिसांच्या हाती लागले आहे. पळालेल्या या ट्रक चालकांनी पोलिसांच्या अंगावर वाहन घालून त्यांच्या हत्येचाही प्रयत्न केला.
जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यवतमाळात येण्यापूर्वी नागपूरला परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त होते. त्यांच्या तेथीलच नेटवर्कमधून शुक्रवारी रात्री त्यांना टीप मिळाली. नागपुरातून जनावरे घेऊन १४ ट्रक निघाले आहेत, ते वेगवेगळ्या मार्गाने हैदराबादकडे रवाना होणार आहेत, अशी ही टीप होती. त्यानंतर लगेच एसपींनी स्थानिक गुन्हे शाखा तसेच हैदराबादकडे जाणाऱ्या मार्गावरील वणी, शिरपूर, मारेगाव, वडकी, पांढरकवडा, पारवा या पोलीस ठाण्यांना नाकेबंदीच्या सूचना दिल्या. त्यानुसार वणी, पांढरकवडा विभागातील सर्व ठाणेदार रात्री रस्त्यावर उतरले. राष्ट्रीय महामार्ग क्र. ७, वणी-मारेगाव-पांढरकवडा, पारवा-पांढरकवडा, वणी-शिरपूर या प्रमुख मार्गांवर नाकेबंदी करण्यात आली. परंतु या नाकेबंदीची कुणकुण लागल्याने १४ पैकी काही ट्रकने वेगळाच मार्ग शोधून आदिलाबाद गाठले. तर काही ट्रकने थेट पोलिसांचे बॅरेकेटस् आणि पिंपळखुटीच्या आरटीओ चेक पोस्टवरील अडथळे उडवून हैदराबादकडे पळ काढला. यातील एका ट्रकने तर वडकीचे ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक पवार यांच्या अंगावर ट्रक घालून त्यांना उडविण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. प्रसंगावधान राखल्याने अनर्थ टळला. पोलिसांनी रिव्हॉल्वरसह सज्ज राहून ट्रक अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकांनी रिव्हॉल्वरलाही जुमानले नाही. या १४ ट्रकचा शोध घेण्यासाठी वडकी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने प्रचंड परिश्रम घेतले. मात्र ११ पैकी केवळ तीन ट्रक नाकेबंदी दरम्यान पोलिसांच्या हाती लागू शकले.
यातील दोन ट्रक पांढरकवडा तर एक ट्रक वणी पोलीस ठाण्यात लावण्यात आला आहे. त्यातील जनावरांना कोंडवाड्यात सोडण्यात आले आहे. एका ट्रकमध्ये २१ ते २५ जनावरे कोंबून भरली जातात. अनेकदा यातील जनावर दगावते. तर काहींना जखमा होतात.
एसपींच्या टीपवरून रात्री केलेल्या नाकेबंदीमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख, दुय्यम निरीक्षक अमोल माळवे, पतिंगे, वणीचे ठाणेदार मुकुंद कुलकर्णी, फौजदार काकडे, मारेगावचे ठाणेदार संजय शिरभाते, वडकीचे ठाणेदार पवार, पारव्याचे ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक राऊत, पांढरकवडा येथील महिला फौजदार मोहोरे, पोलीस कर्मचारी पांडे, महेंद्र भुते, आशिष टेकाळे, शेख इकबाल, नितीन सलामे, जमादार वानोळे, साहेबराव राठोड, भीमराव सिरसाट आदींनी सहभाग घेतला. (जिल्हा प्रतिनिधी)

नागपुरातील ‘भगवान’ जनावर तस्करीचा मुख्य सूत्रधार
हैदराबादला जनावरे व मांसाचा बहुतांश पुरवठा हा नागपुरातून होतो. नागपुरात मध्यप्रदेश व छत्तीसगडमधून मोठ्या प्रमाणात जनावरे व मांस पोहोचतात. नागपुरातील टेका नाका भागातील भगवान नामक व्यक्ती या आंतरराज्यीय तस्करीचा मुख्य सूत्रधार असल्याचे पोलीस वर्तुळातून सांगण्यात आले. दोनशे पेक्षा अधिक ट्रकचे नियंत्रण करणाऱ्या या भगवानचे मुख्य कामच आपल्या या ट्रकमधून जनावरांची तस्करी करण्याची आहे. तस्करीची ही वाहने रात्रीला जांबपर्यंत येतात. तेथून पोलिसांचे लोकेशन घेऊन ही वाहने वेगवेगळ्या मार्गाने आंध्रप्रदेशात पाठविली जातात. या वाहनांच्या मधात येणाऱ्या पोलीस, सामाजिक कार्यकर्ते व अन्य कुणालाही जुमानायचे नाही, थेट उडवून द्यायचे अशा सूचना जनावर तस्करीच्या या वाहनांवरील चालकांना असतात, अशी माहिती आहे. त्यामुळेच की काय शुक्रवारी रात्री वडकी पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान संशयित ट्रकला अडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या अंगावर ट्रक नेऊन उडविण्याचा प्रयत्न झाला. हीच या जनावर तस्करीच्या वाहन चालकांची मोडस आॅप्रेन्डी असल्याचे सांगण्यात येते.

असे आहेत जनावर-मांस तस्करीचे मार्ग

यवतमाळ, आर्णी, माहूर, आदिलाबाद, हैदराबाद
राष्ट्रीय महामार्ग क्र.७ वरील जांब, वडकी, पांढरकवडा, आदिलाबाद, हैदराबाद
नागपूर ते जांब, वरोरा, वणी, शिरपूर, कोरपना, आदिलाबाद
नागपूर ते भद्रावती, घुग्गुस, गडचांदूर, बेला, आदिलाबाद
नागपूर ते वर्धा, कळंब, यवतमाळ, आर्णी, माहूर, सारखणी, आदिलाबाद

Web Title: Note to live 'spin' of trafficking animals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.