कोहळा येथे भरते विनाविद्यार्थ्यांची शाळा
By Admin | Updated: November 30, 2014 23:13 IST2014-11-30T23:13:37+5:302014-11-30T23:13:37+5:30
एक शाळा अशीही आहे की, शाळेत एकही विद्यार्थी नाही. शिक्षक मात्र नियमित येतात. दिवसभर थांबतात आणि निघून जातात, असे कुणालाही सांगितले तर विश्वास बसणार नाही. मात्र हे वास्तव आहे,

कोहळा येथे भरते विनाविद्यार्थ्यांची शाळा
मुख्याध्यापकाची हजेरी : शिक्षण विभागाच्या बेफिकिरीचा नमुना
किशोर वंजारी - नेर
एक शाळा अशीही आहे की, शाळेत एकही विद्यार्थी नाही. शिक्षक मात्र नियमित येतात. दिवसभर थांबतात आणि निघून जातात, असे कुणालाही सांगितले तर विश्वास बसणार नाही. मात्र हे वास्तव आहे, नेर तालुक्यातील पुनर्वसित कोहळा गावचे. शिक्षण विभागाच्या बेफिकिरीचा हा उत्कृष्ट नमुनाच म्हणावा लागेल.
नेर तालुक्यातील कोहळा हे गाव प्रकल्पग्रस्त. कोहळा गावाचे दोन भागात पुनर्वसन झाले. एक भाग नेर शहरानजीक तर दुसरा दगडधानोरा गावालगत आहे. मात्र कोहळा गावात आजही दहा ते बारा घरे कायम आहे. येथे पहिलीपासून चवथीपर्यंत शाळा आहे. परंतु ही शाळा पुनर्वसनात गेली. त्यामुळे गावापासून दीड किलोमीटर अंतरावर शाळेची इमारत बांधण्यात आली. यंदा या शाळेत १२ विद्यार्थी पटावर आहेत. दोन शिक्षकांची येथे नियुक्ती आहे. मुख्याध्यापक म्हणून पदभार असलेले शिक्षक नियमित येत होते. विद्यार्थीही येथे ज्ञानार्जनासाठी जात होते. परंतु एक शिक्षक या शाळेकडे फिरकतही नव्हता. विद्यार्थ्यांची होणारी ही दुरवस्था पाहून पालकांनी शाळेवर बहिष्कार टाकला. तेव्हापासून एकही विद्यार्थी या शाळेत जात नाही. शिक्षकांनी पालकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या शाळेत विद्यार्थ्यांना पाठवायला पालक तयार नाही. वाहनाची व शिक्षकाची व्यवस्था झाली तर आम्ही मुलांना पाठवू असे त्यांचे म्हणणे आहे.
शिक्षण विभागाने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे गत चार महिन्यांपासून एकही विद्यार्थी या शाळेत आला नाही. येथील कार्यरत मुख्याध्यापक दररोज वेळेवर शाळेत जातात आणि ५ वाजता घराकडे निघून जातात. विद्यार्थीच नाही तर शिकवायचे कुणाला असा प्रश्न त्यांना सतावत आहे. काही दिवसापूर्वी त्यांनी पंचायत समितीकडे माझी येथून बदली करा, अशी लेखी मागणी केली. मात्र या मागणीकडे शिक्षण विभाग डोळेझाक करीत आहे. विद्यार्थी येत नाही, हे माहीत असूनही शिक्षण विभागाने उपाययोजना केल्या नाही. मुख्याध्यापक मात्र शाळेत जाऊन हजेरी लावतात. या प्रकरणी संबंधितांवर कारवाईची मागणी पालक जगदीश खासदार यांनी केली.