कुणालाही पाठीशी घालणार नाही

By Admin | Updated: July 3, 2016 02:26 IST2016-07-03T02:26:39+5:302016-07-03T02:26:39+5:30

यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थिनींच्या छेडखानीची घडलेली घटना निंदनीयच असून जनतेचा रोष व त्या अनुषंगाने होणारे आंदोलन सहाजिकच आहे.

No one will support anyone | कुणालाही पाठीशी घालणार नाही

कुणालाही पाठीशी घालणार नाही

मुख्यमंत्र्यांची ग्वाही : वायपीएसचे प्रकरण, तिसऱ्या दिवशीही रोष
यवतमाळ : यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थिनींच्या छेडखानीची घडलेली घटना निंदनीयच असून जनतेचा रोष व त्या अनुषंगाने होणारे आंदोलन सहाजिकच आहे. परंतु त्याला शांततेचा मार्ग हवा, असे स्पष्ट करताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात कुणालाही पाठीशी घालणार नाही, अशी ग्वाही यवतमाळकर जनतेला दिली.
वायपीएसच्या दोन शिक्षकांवर विद्यार्थिनींच्या छेडखानीचा आरोप आहे. या प्रकरणात या शिक्षकांना अटक करण्यात आली. त्यांना संस्थेतून काढूनही टाकण्यात आले. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ पालक, राजकीय पदाधिकारी-कार्यकर्ते व नागरिकांचा रोष शनिवारी तिसऱ्या दिवशीही कायम होता. हे आंदोलक सकाळी दारव्हा नाक्यावर एकत्र आले. तेथून त्यांनी आपला मोर्चा संस्था सचिवांच्या घराकडे वळविला. बराच वेळ हे आंदोलक तेथे होते. त्यांनी घोषणाही दिल्या. काही वेळानंतर यवतमाळचे आमदार मदन येरावार तेथे पोहोचले. त्यांनी लाऊड स्पीकरवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा व्हॉईस रेकॉर्डरवरील संदेश आंदोलक पालकांना ऐकविला. मुख्यमंत्री या संदेशात म्हणाले, छेडखानीचे हे प्रकरण गंभीर आहे. या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालविला जाईल, आवश्यकता भासल्यास चांगल्यात चांगला वकील त्यासाठी नेमला जाईल. सर्व पालकांच्यावतीने एक संयुक्त समिती स्थापन केली जावी, ही समिती चौकशी अधिकाऱ्यांना आपल्या सूचना सादर करतील, या सूचनांची दखल घेतली जाईल, असे ना. फडणवीस यांनी स्पष्ट केले. तत्पूर्वी आमदार मदन येरावार यांनीही पालकांना शांततेचे आवाहन केले. येरावार म्हणाले, छेडखानीचे हे प्रकरण आपण विधानसभेत मांडू, यातील दोषींवर निश्चित कारवाई होईल, कोणतीही संस्था, पदाधिकाऱ्यांची गय होणार नाही, या प्रकरणाची नि:पक्ष चौकशी केली जाईल. पालकांनी तक्रारी कराव्या, त्यांना न्यायालयात जावे लागणार नाही, असे आवाहनही यावेळी येरावार यांनी केले. छेडखानीच्या या प्रकरणामुळे सर्वच पालकांच्या मनामध्ये आपल्या मुलांच्या सुरक्षिततेविषयी भीती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात अन्य शाळांमध्येही असा प्रश्न असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशी प्रकरणे रोखण्यासाठी सखोल चौकशी करून ठोस उपाययोजना करण्याची ग्वाही मदन येरावार यांनी दिली. शनिवारी आंदोलकांनी प्रवासी निवारे, आॅटोरिक्षा स्टँडवर दगडफेक करून तोडफोड केली. शनिवारी सकाळी प्राचार्य जेकब दास यांना अटक करून न्यायालयीन कोठडी देण्यात आली.
सायंकाळी पालकमंत्री संजय राठोड, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्या उपस्थितीत पालकांची बैठक झाली. या बैठकीत पालकांनी आपल्या विविध मागण्या ठेवल्या. त्याच्या अंमलबजावणीची ग्वाही मान्यवरांनी दिली. यावेळी उपरोक्त मान्यवरांनी पालक, नागरिक व राजकीय नेते-पदाधिकाऱ्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले. (शहर वार्ताहर)

Web Title: No one will support anyone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.