विकासाला कुणाचाही विरोध होणार नाही
By Admin | Updated: December 30, 2016 00:08 IST2016-12-30T00:08:20+5:302016-12-30T00:08:20+5:30
नगरपरिषदेत भाजपाकडे स्पष्ट बहुमत तर नगराध्यक्षपद शिवसेनेकडे आहे. हा जनतेने दिलेला कौल आहे.

विकासाला कुणाचाही विरोध होणार नाही
कांचन चौधरी : नगराध्यक्षांचा पदभार स्वीकारला
यवतमाळ : नगरपरिषदेत भाजपाकडे स्पष्ट बहुमत तर नगराध्यक्षपद शिवसेनेकडे आहे. हा जनतेने दिलेला कौल आहे. शहर विकासाला कोणीच विरोध करणार नाही. नगराध्यक्ष म्हणून संपूर्ण यवतमाळकरांनी माझी निवड केली आहे. त्यामुळे सर्वांगीण विकासाला चालना देणार असल्याचे नगराध्यक्ष कांचन बाळासाहेब चौधरी यांनी नगराध्यक्षपदाचा गुरूवारी पदभार स्वीकारल्यानंतर ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
शहरातील पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन, शहर स्वच्छता आणि पात्र लाभार्थी घरकूलपासून वंचित राहून नये यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. नगरपरिषदेची गत पाच वर्षात प्रशासकीय घडी पूर्णत: विस्कटलेली आहे. यंत्रणा कार्याक्षम करण्यासाठी आवश्यक बदल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जनहिताची कामे करण्यासाठी बहुमताची गरज नाही. कुणाचा वैयक्तीक स्वार्थ आडवा आला तरच विरोध होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पदभार स्वीकारते वेळी यावेळी माजी खासदार सदाशिवराव ठाकरे, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चौधरी, नगरसेवक गजानन इंगोले, राजेंद्र गायकवाड, किशोर इंगळे, गजानन डोमाळे आदी उपस्थित होते. दरम्यान नवनियुक्त पालकमंत्री मदन येरावार यांनी नगरपरिषदेत येऊन नगराध्यक्ष कांचन चौधरी यांचे स्वागत केले. तर प्रशासनाच्यावतीने मुख्याधिकारी सुदाम धुपे यांनी त्यांचे स्वागत केले.
सोमवारी उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्यांची निवड
नगरपरिषदेची सर्र्वसाधारण सभा सोमवारी आयोजित केली आहे. या सभेत उपाध्यक्ष आणि स्वीकृत सदस्यांची निवड केली जाणार आहे. त्यापूर्वी स्वीकृत सदस्यांना जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांकडे शनिवारी नामांकन दाखल करावे लागणार आहे. त्यानंतर स्वीकृत सदस्यांची नावे नगराध्यक्षाकडे दिली जाणार आहे. उपाध्यक्षाची निवड सभेतून होणार आहे. उमरखेड नगराध्यक्षांनी बुधवारी सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे.