जलवाहिनी फुटल्याने यवतमाळात निर्जळी
By Admin | Updated: November 15, 2014 22:53 IST2014-11-15T22:53:30+5:302014-11-15T22:53:30+5:30
भूमिगत ओएफसी केबल टाकण्याच्या कामासाठी मशीनने खोदकाम करताना जीवन प्राधिकरणाची मुख्य जलवाहिनी फुटली. अवघ्या तासाभरात १५ लाख लिटर पाणी रस्त्यावर वाहून गेले.

जलवाहिनी फुटल्याने यवतमाळात निर्जळी
‘रिलायन्स’चा प्रताप : तहसीलसह पोलीस मुख्यालय जलमय
यवतमाळ : भूमिगत ओएफसी केबल टाकण्याच्या कामासाठी मशीनने खोदकाम करताना जीवन प्राधिकरणाची मुख्य जलवाहिनी फुटली. अवघ्या तासाभरात १५ लाख लिटर पाणी रस्त्यावर वाहून गेले. या पाण्यामुळे तहसील आणि पोलीस मुख्यालयाचा परिसर जलमय झाला होता. तर अर्ध्या यवतमाळ शहरातील एक लाख नागरिकांना पिण्याचे पाणीच मिळाले नाही. दरम्यान खोदकामाविरोधात जीवन प्राधिकरणाने सदर कंपनीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
यवतमाळ शहरात रिलायन्स जीओ इन्फो कॉम लिमिटेड कंपनीच्यावतीने आॅप्टीकल फायबर केबल (ओएफसी) टाकण्याचे काम हाती घेतले आहे. कंपनीला मनुष्यबळाच्या सहाय्याने खोदकाम करण्याच्या सूचना होत्या. मात्र कंपनीने अद्यवत मशनरीच्या साहाय्याने शहरात खोदकाम सुरू केले. शुक्रवारी मध्यरात्री तहसील चौकात खोदकाम सुरू असताना जीवन प्राधिकरणाची मुख्य जलवाहिनी फुटली. याची कोणतीही कल्पना नव्हती. सकाळी जीवन प्राधिकरणाने पाणीपुरवठ्यासाठी ही वाहिनी सुरू केली. मात्र तासाभरात १५ लाख लिटर पाणी रस्त्यावर वाहून गेले. हा प्रकार लक्षात आला तोपर्यंत बराच वेळ निघून गेला होता. जलवाहिनीतील धो-धो वाहणारे पाणी लगतच्या तहसील कार्यालय परिसरात शिरले. संपूर्ण परिसर जलमय झाला होता. तहसील कार्यालयातील कोरडी विहिरही या पाण्याने ओव्हरफ्लो झाली होती. पोलीस मुख्यालय परिसरातही पाणी शिरले. तसेच नगरपरिषदेच्या मुख्य इमारतीपर्यंत पाण्याचे लोट पोहोचले होते. तर दुसरीकडे टांंगा चौकापर्यंत पाण्याचा धो-धो प्रवाह वाहत असल्याने अनेक दुकानात पाणी शिरले. पहाटे झालेल्या या प्रकाराने सारेच जण चकीत झाले. त्यानंतर जीवन प्राधिकरणाने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले.
यवतमाळ शहरात आधीच एक दिवस आड पाणीपुरवठा होतो. पाणी पाळीनुसार मुख्य बाजारपेठ, पोलीस वसाहत, पांढरकवडा रोड, भोसा मार्ग आणि धामणगाव मार्गाला शनिवारी पाणी मिळणार होते. मात्र मुख्य जलवाहिनीच फुटल्याने या भागात पाणीच पोहोचले नाही. तब्बल एक लाख लोकांना पाणीच मिळाले नाही. काही भागात दुपारच्या वेळात गढूळ पाणी येत होते. तब्बल एक लाख नागरिकांना पाण्यापासून वंचित रहावे लागले. सायंकाळी जीवन प्राधिकरणाच्यावतीने शहरात ध्वनिक्षेपकावरून सूचना देऊन दुरुस्ती काम होईपर्यंत पाणीपुरवठा होणार नाही, असे सांगितले. (शहर वार्ताहर)