नऊ कोटींच्या अपहाराचा तपास पारवा पोलिसांच्या आवाक्याबाहेर
By Admin | Updated: January 19, 2017 00:50 IST2017-01-19T00:50:36+5:302017-01-19T00:50:36+5:30
निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या भूसंपादनात उघडकीस आलेल्या नऊ कोटी रुपयांच्या अफरातफर प्रकरणाचा तपास

नऊ कोटींच्या अपहाराचा तपास पारवा पोलिसांच्या आवाक्याबाहेर
निम्न पैनगंगा भूसंपादन : आर्थिक गुन्हे शाखा, सीआयडीचा पर्याय
आर्णी : निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या भूसंपादनात उघडकीस आलेल्या नऊ कोटी रुपयांच्या अफरातफर प्रकरणाचा तपास पारवा पोलिसांच्या आवाक्याबाहेर असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळेच या तपासासाठी एलसीबीच्या अधिपत्त्याखालील आर्थिक गुन्हे शाखा किंवा राज्य गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीआयडीचा पर्याय दिसतो आहे.
किनवटचे प्रकरण सुरू असतानाच आता घाटंजी तालुक्यातील पारवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत या भूसंपादनातील नऊ कोटी रुपयांची अफरातफर उघडकीस आली आहे. विशेष असे या प्रकरणात केवळ तलाठ्याला आरोपी बनविण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते. कोरडवाहू जमीन ओलिताची दाखवून हा अपहार केला गेला आहे. एवढ्या मोठ्या प्रकरणात एकटा तलाठी दोषी असणे शक्यच नाही. त्यामुळे यातील आरोपींची संख्या वाढण्याची आणि त्याची व्याप्ती शासकीय यंत्रणेतील तत्कालीन दंडाधिकाऱ्यांपर्यंत असण्याची दाट शक्यता आहे. शिवाय ‘ओलिता’चा लाभ घेणारे शेतकरीही या प्रकरणी अडचणीत येण्याची शक्यता आहे.
नऊ कोटींच्या अपहाराचे हे एकूणच प्रकरण गंभीर असले तरी आर्णी तालुका महसूल प्रशासन आणि पोलीस यंत्रणा त्याबाबत तेवढे गांभीर्य बाळगताना दिसत नाही. अपहाराची रक्कम आणि प्रकरणाची व्याप्ती पाहता नऊ कोटींच्या या घोटाळ्याचा तपास पारवा पोलिसांच्या आवाक्याबाहेरचा दिसतो आहे. त्यामुळे हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखा किंवा राज्य शासनाची महत्वाची तपास संस्था असलेल्या सीआयडीकडे वर्ग होणे अपेक्षित आहे. नऊ कोटींची रक्कम पाहून पारवा पोलीस सध्या तरी या प्रकरणात हातावर हात देऊन बसल्याचे दिसून येते. (शहर प्रतिनिधी)