निम्न पैनगंगा भूसंपादनात नऊ कोटींची अफरातफर
By Admin | Updated: January 18, 2017 00:02 IST2017-01-18T00:02:13+5:302017-01-18T00:02:13+5:30
निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या भूसंपादनामध्ये तब्बल नऊ कोटी रुपयांची अफरातफर झाल्याचे पुढे आले असून

निम्न पैनगंगा भूसंपादनात नऊ कोटींची अफरातफर
तलाठी मुख्य आरोपी : ४६ शेतकऱ्यांचा सातबारा बदलविला
आर्णी : निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या भूसंपादनामध्ये तब्बल नऊ कोटी रुपयांची अफरातफर झाल्याचे पुढे आले असून या प्रकरणी खडका येथील सेवानिवृत्त तलाठ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर तलाठ्याने ४६ शेतकऱ्यांच्या सातबारा बदलविल्याचा आरोप आहे.
निम्न पैनगंगा प्रकल्पासाठी भूसंपादन करताना तत्कालीन तलाठी विनोद हरिभाऊ ठाकरे (६०) यांनी शेतकऱ्यांच्या मूळ सातबारा ऐवजी बनावट सातबारा दिले. त्यामध्ये सातबाराचा आकार बदलविणे, सिंचन क्षेत्र नसताना सिंचन दाखविणे आदी बाबी केल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे या प्रकरणी यवतमाळ येथील प्रा.डॉ. प्रदीप राऊत यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. त्यावरून नांदेड जिल्हाधिकारी आणि यवतमाळचे उपविभागीय अधिकारी यांची चौकशी समिती गठित करण्यात आली. या समितीने सादर केलेल्या अहवालानुसार नांदेड व यवतमाळ जिल्ह्यातील २०० हेक्टर जमिनीचा खरेदी मोबदला शेतकऱ्यांना आठ कोटी ७७ लाख ४१ हजार ३८४ रुपये नियमबाह्य प्रदान करण्यात आल्याचे चौकशीत पुढे आले.
२००९-१० या कालावधीत धरण रेषा व बुडित क्षेत्रातील खडका येथील ४६ शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाने खरेदी केल्या आहे. यात २०१२ मध्ये खरेदी संबंधित तक्रार प्राप्त झाल्याने उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात आली होती. यामध्ये सरळ खरेदी वेळी शेतकऱ्यांनी सादर केलेले महसूल खात्याचे सातबारा व मूळ सातबारा यामध्ये तफावत असल्याचे पुढे आले. यावरून यामध्ये अफरातफर झाल्याचे पुढे आले. अखेर आर्णी येथील तहसीलदार सुधीर पवार यांनी सोमवारी घाटंजी तालुक्यातील पारवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून तत्कालीन तलाठी विनोद ठाकरे याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. (शहर प्रतिनिधी)
आरोपी केवळ तलाठी कसा ?
कुठल्याही प्रकल्पासाठी भूसंपादन करताना महसुलातील संपूर्ण यंत्रणा या कामाला लागते. जागेचे अवार्ड काढताना भूसंपादन अधिकारी, संबंधित तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि शेवटी तलाठी अशी यंत्रणा काम करते. शिवाय जमीन संपादन करताना भूमिअभिलेख विभागाचा अहवालही महत्वाचा मानला जातो. मात्र आर्णी तालुक्यातील भूसंपादन प्रकरणातील अफरातफरीत केवळ तलाठ्यावरच आरोप निश्चित करण्यात आले. नऊ कोटी रुपयांच्या प्रकरणात केवळ तलाठीच आरोपी कसा असा प्रश्न आता विचारला जात आहे. या प्रकरणात अनेक मोठे मासेही असण्याची शक्यता नाकारता येत नाही.