नीलगाय, रानडुकरांमुळे शेतकरी त्रस्त
By Admin | Updated: December 25, 2014 23:39 IST2014-12-25T23:39:53+5:302014-12-25T23:39:53+5:30
वणी तालुक्यातील शेतकरी नीलगाय, रानडुक्कर व हरीणासारख्या वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे चांगलेच त्रस्त झाले आहे़ वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात पिकांची नासधूस करीत असूनही शेतकरी

नीलगाय, रानडुकरांमुळे शेतकरी त्रस्त
नांदेपेरा : वणी तालुक्यातील शेतकरी नीलगाय, रानडुक्कर व हरीणासारख्या वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे चांगलेच त्रस्त झाले आहे़ वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात पिकांची नासधूस करीत असूनही शेतकरी जाचक कायद्यांमुळे त्यांचा बंदोबस्त करू शकत नाही.
मानव जातीप्रमाणे इतरही पशु-पक्ष्यांना जीवन जगण्याचा अधिकार आहे़ त्यासाठी शासनाने वन्यजीव संरक्षण कायदा तयार केला. तो प्रत्यक्ष अंमलातही आणला आहे. या कायद्यामुळे जंगलातील प्र्रत्येक जीवाला संरक्षण मिळाले आहे़ मात्र हा कायदा शेतकऱ्यांच्या जीवावर उठला आहे़ वन्यप्राण्यांमुळे शेतकरी असुरक्षित झाले आहेत. शेतशिवारात शेतकऱ्यांना जाणे कठीण झाले आहे़ वन्यप्राणी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत असल्याने आर्थिक फटकाही सहन करावा लागत आहे़ विशेष म्हणजे हा प्रकार डोळ्यासमोर होत असूनही वन्यप्राणी कायद्यामुळे वन्यप्राण्यांना शेतकरी इजासुध्दा करू शकत नाही़ त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत़
पेरणीपासून तर पीक हातात येईपर्यंत, ग्रामीण भागातील शेतकरी डोळ्यात तेल घालून दिवसरात्र पिकांचे संरक्षण करून त्यांचे संवर्धन करतात.
यासाठी शेतकऱ्यांना हजारो रूपये खर्च करावा लागतो. महागडे बियाणे पेरणी करावे लागते. महागडी औषधे घेऊन फवारणी करावी लागते. निंदण, डवरणी करावी लागते. प्रचंड परिश्रम घेऊन पिके घेतली जातात. मात्र शेतकरी वन्यप्राण्यांच्या उपद्रवाला रोखण्यास असमर्थ ठरत आहे़ त्यामुळे दरवर्षी पिकांचे मोठे नुकसान होत आहे़ शेतीचा कितीही बंदोबस्त केला, तरीही उपद्रवी वन्यप्राणी, रानडुकरांचा कळप शेतात घुसून पिकांचे नुकसान करीत आहे.
सध्या खरिपाची तुर शेतात उभी आहे. मात्र रानडुकरे तुरीत घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहे. हा नासधुसीचा प्रकार नित्याचाच झाल्याने शेतकरी हताश झाले आहेत़ वन्यप्राणी शेतात येऊ नये म्हणून शेतकरी बरेचदा विचित्र उपाययोजना आखतात़ त्या जिवघेण्या उपाययोजना अनेकदा शेतकऱ्यांच्या जिवावरही बेतल्या आहेत. त्यात काही शेतकऱ्यांना प्राणही गमवावे लागले आहे.
मागील वर्षी वणी तालुक्यात फेफरवाडा येथील शेतकऱ्याने शेताभोवताच्या कुंपणाला विजेचा करंट लावून ठेवला होता़ त्यात शेतकऱ्याचाच मृत्यू झाला होता़ शेतीभोवती तारेचे कुंपण जरी केले, तरी त्याला न जुमानता रानडुकरांचे कळप शेतात मुसंडी मारतात़ सुरूवातीला फटाक्याच्या आवाजाने वन्यप्राणी पळ काढायचे. मात्र हा आवाज नित्याचा व ओळखीचा झाला असून रानडुकरे सरळ शेतात घुसून पिकांची नासधूस करीत आहे़ त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केल्यास ते उलट शेतकऱ्यांवरच हल्ला करतात़
दरवर्षी या घटनेत वाढ होत असून शेतकऱ्यांमध्य्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतकरी रात्री शेताची राखण सोडून घरीच राहणे पसंत करीत आहे़ परिणामी रानडुकरांना पूर्ण शेत मोकळे दिसत आहे़
दुसरीकडे नीलगाय, हरिण हे वन्यप्राणी तुरीच्या पिकावर हल्लाबोल करीत आहे. तुरीच्या शेंगा ते फस्त करतात. निसर्ग, शासनासोबतच वन्यप्राण्यांकडून शेतकरीच नागविला जात आहे़ वन्यप्राण्यांच्या संरक्षणाचा कायदा असल्याने शेतकरी काहीही करू शकत नाही़ (वार्ताहर)