सफाई कंत्राटदाराचे चक्क नगरसेवकांनाच सूचनापत्र
By Admin | Updated: December 27, 2014 02:38 IST2014-12-27T02:38:50+5:302014-12-27T02:38:50+5:30
नगरपरिषदेत गेल्या काही दिवसांपासून सफाई कंत्राटदार आणि नगरसेवक यांच्यात धुसफूस सूरू आहे.

सफाई कंत्राटदाराचे चक्क नगरसेवकांनाच सूचनापत्र
यवतमाळ : नगरपरिषदेत गेल्या काही दिवसांपासून सफाई कंत्राटदार आणि नगरसेवक यांच्यात धुसफूस सूरू आहे. अशा स्थितीत कंत्राट रद्द करून नवीन निविदा प्रक्रिया घेण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत चर्चेसाठी ठेवण्यात आला होता. त्यापूर्वीच मध्यरात्री सफाई कंत्राटदाराने नगरसेवकांना सूचनापत्राचे वितरण केले. त्यामुळे हा मुद्दा सभेत चांगलाच गाजला. अनेक नगरसेवकांनी हा काय प्रकार आहे याची विचारणा केली. त्यावर नगराध्यक्ष सुभाष राय यांनी भुमिका स्पष्ट करत परिणामास वैयक्तिकरित्या जबाबदार राहील अशी हमी दिली. त्यानंतर कंत्राटासाठी नव्याने निविदा मागण्याचा ठराव मंजूर झाला.
शहरातील स्वच्छतेबाबत सातत्याने तक्रारी केल्या जातात. बरेचदा कंत्राटदाराकडून निर्धारित सफाई कामगारही पूरविले जात नाही. त्यामुळे शहराचे चार झोन करून जीपीएस सीस्टीमच्या माध्यमातून यावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. त्याच दृष्टिकोणातून नवीन निविदा प्रक्रियेचा सभेत ठराव घेण्यात आला. तसेच शहराच्या वाढीव लोकसंख्येच्या दृष्टिकोणातून आणखी एक मडपंप व्हॅक्युम लोडर खरेदीचा ठराव घेण्यात आल्याचे नगराध्यक्ष सुभाष राय यांनी सांगितले.
नगरपरिषदेच्या सफाईचे कंत्राट क्षीतिज नागरिक सेवा सहकारी संस्था अमरावती यांना देण्यात आले आहे. हे कंत्राट तीन वर्षासाठी दिले असल्याची सबब कंत्राटदाराकडून सांगितले जात आहे. तर कंत्राट हे एक वर्षासाठी असून, प्रत्येक वर्षी मुदतवाढ देण्याचा करार असल्याचे नगरपरिषद प्रशासनाकडून सांगण्यात येते. यावरूनच धुसफूस सुरू आहे. हे कंत्राट रद्द करून नवीन निविदा प्रक्रिया राबविण्याचा मुद्दा सभेत चर्चेला ठेवण्यात आला होता. त्यापूर्वीच मध्यरात्री १२ वाजता सफाई कंत्राटदाराने नगरसेवकांना सूचनापत्र देऊन कंत्राटासंबंधात न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याचे पत्र संस्थेचे अध्यक्ष दिनेश गहलोत यांच्याकडून शहरातील नगरसेवकांकडे देण्यात आले. नगरपरिषदेच्या इतिहासात प्रथमच एखादे कंत्राट रद्द करण्यासाठी एवढ्यामोठ्या प्रमाणात घिसाडघाई होत आहे.
कंत्राटदाराकडून न्यायालयात जाण्याचा हा प्रकार येथेच घडला आहे. (कार्यालय प्रतिनिधी)