पांढरकवडा येथे नवविवाहितेची आत्महत्या
By Admin | Updated: June 26, 2017 00:46 IST2017-06-26T00:46:48+5:302017-06-26T00:46:48+5:30
अवघ्या दोन महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या एका नवविवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना

पांढरकवडा येथे नवविवाहितेची आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : अवघ्या दोन महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या एका नवविवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना येथील शास्त्री वार्डात रविवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी तिच्या पतीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
सोनाली रुपेश बारसागडे (२४) असे मृत विवाहितेचे नाव आहे. तिने घराच्या छताला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली.
आर्णी येथील हरिश कानडे यांची कन्या सोनाली आणि पांढरकवडा येथील रुपेश बारसागडे यांचा विवाह १७ एप्रिल २०१७ रोजी थाटात संपन्न झाला होता. लग्नापूर्वी नेताजी सुभाषचंद्र बोस वार्डात परिवारासह एकत्र राहणारा रुपेश लग्नानंतर पत्नीसह शास्त्री वार्डात भाड्याने राहत होता. त्याचा पानठेल्याचा व्यवसाय आहे. नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी ७.३० वाजता तो पानठेल्यावर गेला. तत्पूर्वी पत्नीने त्याला नाश्ताही करून दिला होता. पती बाहेर गेल्यावर तिने दार लावून घेतले. इकडे सोनालीच्या खोलीचा दरवाजा आतून लावून दिसल्याने घरमालकीनने आवाज दिला. परंतु प्रतिसाद मिळाला नाही. शेजाऱ्यांना बोलावून दार तोडले असता सोनाली गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आली. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नाही. दरम्यान सोनालीचा भाऊ विक्की कानडे याने पोलिसात तक्रार दाखल केली असून आपल्या बहिणीची आत्महत्या नसून तिचा खूनच करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यावरून पोलिसांनी सोनालीचा पती रुपेश याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक असलम खान यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पिदूरकर तपास करीत आहे.